परतीच्या पावसामुळे भातपीक धोक्यात
By admin | Published: October 5, 2015 09:59 PM2015-10-05T21:59:32+5:302015-10-06T00:17:41+5:30
शेतकरी चिंतेत : जाता-जाता पावसाचा आणखी एक दणका
रत्नागिरी : गेले चार-पाच दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दुपारनंतर ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने तयार भातपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी कमी पावसामुळे आधीच भात उत्पादनावर परिणाम झाला असल्याने परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होत असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी दिली. यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण होऊ नये, यासाठी पाऊस आवश्यक असला तरी तयार भातपिकास मारक ठरत आहे. जिल्ह्यात ४० टक्के हळवे, ४० निमगरवे, तर २० टक्के गरव्या जातीचे भात बियाणे लावण्यात आले आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. मात्र, एक तारखेपासून सलग लागत असलेल्या पावसामुळे तयार भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कापून वाळत ठेवलेले भात शेतावरच भिजत असल्याने संबंधित भात वाळण्याऐवजी पुन्हा भिजत आहे. सलग पाच दिवस भिजल्याने भाताला अंकुर येण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे भातपीक जमीनदोस्त झाले आहे. एकूणच ‘शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’ असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.निमगरवे भातपीकही तयार होण्याच्या मार्गावर आहे. लोंब टाकण्यात आली असून, दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गरवे भात आता फुलोऱ्यात आहे. पावसामुळे फुलोरा झडण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच तयार हळव्या भातपिकाबरोबर गरव्या, निमगरव्या भातासाठी पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. गतवर्षी अवेळी पावसामुळे आंबा, काजूच्या पीक नुकसान झाले होते. भातलागवडीसाठी पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर लागवड केली होती. मात्र, पाऊस गायब असल्याने पिके पिवळट पडली होती. परंतु अधूनमधून लागणाऱ्या सरीमुळे भाताला जीवदान मिळाले. एकूणच दरवर्षीपेक्षा एकहजार मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला होता. (प्रतिनिधी) भात कापणीयोग्य झाले असतानाच पावसाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बरसायला सुरुवात केली. त्यामुळे ‘आधी उल्हास त्यात फाल्गुन मास’प्रमाणे आधीच बिकट स्थिती असलेल्या भात पिकाची स्थिती वाईट झाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे.