तेरेखोल नदीत आढळले दुर्मीळ लेदरबॅक कासव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:34 PM2022-06-13T17:34:36+5:302022-06-13T17:34:55+5:30
भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर या 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात.
कोल्हापूर : सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीत मच्छीमाराच्या जाळ्यात अडकेलेले ‘लेदरबॅक’ हे जगातील सर्वात मोठे सागरी कासव अडकले होते. मच्छीमाराने या कासवाची जाळ्यातून सुटका करून पुन्हा त्याला समुद्रात सोडले. राज्याच्या सागरी क्षेत्रातील या कासवाची तिसऱ्यांदा छायाचित्राच्या रुपात नोंद झाली आहे.
राज्याच्या सागरी क्षेत्रात ‘ऑलिव्ह रिडले’, ‘ग्रीन सी’, ‘हाॅक्सबिल’ तसेच ‘लाॅगरहेड’ असे चार प्रकारचे समुद्री कासवे आढळतात. यातील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये 'लेदरबॅक' प्रजातीच्या कासवाचेही दर्शन राज्याच्या समुद्रामध्ये हाेत आहे. भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर या 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात. महाराष्ट्रात १९८५ मध्ये मालवणजवळील देवबागच्या किनाऱ्यावर साडेचार फुटांचे 'लेदरबॅक' कासव आढळले होते. तशी नोंद 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'कडे (सीएमएफआरआय) आहे; परंतु त्याचे छायाचित्र उपलब्ध झाले नव्हते.
दरम्यान जून, २०१९ मध्ये रायगडमधील भरडखोल येथे मच्छीमाराच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये डहाणू समुद्र किनाऱ्यानजीकही 'लेदरबॅक' कासवाचे छायाचित्र मिळाले होते. त्यानंतर आता तेरेखोलनजीक समुद्रामध्ये या कासवाचा वावर आढळला आहे.
तेरेखोल नदीच्या मुखाजवळ दि. २८ मे रोजी रुपेश महाकाळे हे मासेमारी करत होते. यावेळी काळ्या रंगाचे हे वेगळे कासव त्यांच्या जाळ्यात अडकलेले दिसले. त्यांनी तत्काळ जाळे कापून या कासवाची सुटका केली आणि त्याला पुन्हा समुद्रात सोडले. त्यांनी या घटनेचे मोबाइलमध्ये छायाचित्रण केले आहे. हे छायाचित्रण 'मँग्रोव्ह फाउंडेशन'ला पाठवले.
उन्हाळ्यात होतेय स्थलांतर
महाराष्ट्रात पूर्वी आढळलेल्या लेदरबॅक कासवांच्या नोंदी या उन्हाळ्यात झाल्या आहेत. जून २०१९ मध्ये भरडखोल आणि मार्च २०२१ मधील पालघर जिल्ह्यातील नोंदही उन्हाळ्यातील आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच सागरी परिक्षेत्रात ही कासवे स्थलांतर करत असावीत, असा अंदाज कासव संवर्धन करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला आहे.