पुरळ-कोठारवाडीतील घटना : खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजी, शेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:07 PM2018-03-19T12:07:04+5:302018-03-19T12:07:04+5:30
पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
देवगड : पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
पुरळ-कोठारवाडीतील खारभूमी बंधारा मजबुतीकरण कामासाठी जलसंधारण विस्तार व सुधारणा योजनेअंतर्गत ९ लाख ९२ हजार ६७५ रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे या कामाला सुरूवात केली गेली. परंतु असलेल्या बंधाऱ्यांलाच बाजूने भर घालून हे काम सुरू केले गेले.
आधी पाणी अडवणे गरजेचे असतांना पर्यायी बंधारा न बांधताच कामाला सुरूवात करण्यात आली व यावेळी सदर बंधाऱ्यांची झडपे काढली गेली असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाली आहे.
एकदा जमिनीत खारे पाणी शिरले तर तीन वर्षे पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान संबंधितांनी भरून द्यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी प्रदिप खर्से, बाळू दुदवडकर, सलीम चौगुले, मिलिंद बोंबडी, विपुल आंबेरकर, समीर पुरळकर उपस्थित होते.
नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
खारबंधाऱ्यांचे काम बंद पाडण्यात आले असता पुन्हा दोन दिवसांत हे काम त्याच पध्दतीने सुरू केल्याने शेतकऱ्यांनी काम करण्यास विरोध केला. संबधित बंधाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी खारबंधाऱ्यांचे अधिकारी हजर नसल्याने प्रदिप खर्से यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कामाचे कॉन्ट्रक्टर निखिल घेवारे यांनी बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधणे व नंतर काम सुरू करणे गरजेचे होते. या कामाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात यावी व झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदिप खर्से तसेच अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.