नगराध्यक्षपदावरून रस्सीखेच
By admin | Published: November 16, 2015 10:57 PM2015-11-16T22:57:41+5:302015-11-17T00:02:29+5:30
दोडामार्ग नगरपंचायत : शिवसेनेच्या सहकार्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी
कसई दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-पुरुष आरक्षण पडले आहे. मात्र, अद्याप या नगरपंचायत निवडणुकीत सतरा जागांपैकी शिवसेना ५, भाजप ५ अशा एकूण दहा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवूनदेखील नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपचेही तेवढेच योगदान आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद भाजपकडे द्यावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत सतरा जागांपैकी भाजप ५, शिवसेना ५ असे युतीचे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ असे आघाडीचे सहा, तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला. सतरा जागांपैकी दहा जागा युतीकडे असल्याने या नगरपंचायतीवर युतीची सत्ता असल्याचे चित्र स्पष्ट होते. नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागासवर्ग महिला किंवा पुरुष असे पडल्याने अनेकांचे पत्ते कट झाले.
नागरिकांचा मागास प्रवर्गातून शिवसेना-भाजपकडे निवडून आलेले उमेदवार असल्याने या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. जोरदार रस्सीखेचही सुरू आहे. यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांच्याशी संपर्क साधला असता, या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष भाजपचा बसणार आहे. अडीच-अडीच वर्षे दोन्ही पक्षांचे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष राहणार असल्याचे वरिष्ठ पातळीवर निश्चित केले आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा बसेल, असे धुरी यांनी सांगितले. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले की, नगराध्यक्ष निवडीसंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नसून, नगराध्यक्ष शिवसेनेचा की भाजपचा हे निश्चित झालेले नाही. नगराध्यक्षपदी भाजपचाच नगराध्यक्ष बसला पाहिजे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. राज्यात युतीची सत्ता आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे पालकमंत्री, खासदार, आमदार ही महत्त्वाची पदे आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपचेही मोेठे योगदान आहे. राज्यात सेना-भाजपची सत्ता असून, जिल्ह्यात भाजपकडे कोणतीही महत्त्वाची पदे नाहीत. तेव्हा कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सेना-भाजपने युतीच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व मिळविले. नगरपंचायतीवर नगराध्यक्षपद भाजपकडे देऊन नगराध्यक्ष युतीच्या माध्यमातून करावा. एवढे तरी जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला सहकार्य करावे, अशी अपेक्षा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
भाजप कार्यकर्त्यांचा नगराध्यक्षपदासाठी आग्रह
कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरा जागांपैकी दहा जागा युतीने जिंकल्या. मतदारांनी विश्वास ठेवून युतीच्या उमेदवारांना निवडून आणले. नगराध्यक्ष शिवसेनेचा बसावा, अशी शिवसेनेची मागणी असून, भाजपचा पहिला नगराध्यक्ष का बसू नये, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित करत नगराध्यक्षपदासाठी आग्रह धरला आहे.