कणकवलीत शास्त्रीय संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:26 PM2019-12-11T13:26:45+5:302019-12-11T13:28:33+5:30

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.

Rasht Mantra, Vasantrao Achrekar Pratishthan organized in Kankavali Classical Music Festival | कणकवलीत शास्त्रीय संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

कणकवली येथे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या शास्त्रीय संगीत महोत्सवात मनोज मेस्त्री यांनी सुमधुर गायन केले.

Next
ठळक मुद्देपं . रघुनंदन पणशीकरांसह मनोज मेस्त्री यांचेही गायन अर्जुन पटवर्धन यांचे सतारवादन ठरले लक्षवेधी

सुधीर राणे

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली शहरात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाट्यमहोत्सवाबरोबरच गेली बाविस वर्षे शास्त्रीय संगीत महोत्सव आणि त्या अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शास्त्रीय संगीत कार्यशाळेच्या माध्यमातून अभिजात संगीत रसिकांना संगीताच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात या संस्थेला चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे रसिकांची येथील कार्यक्रमांना येण्याची ओढ वाढत आहे.

यापूर्वी या शास्त्रीय संगीत महोत्सवात पं. सत्यशील देशपांडे , अलकाताई मारुलकर , पं. शौनक अभिषेकी , पं. कैवल्यकुमार गुरव , पं. संजीव अभ्यंकर , तालयोगी सुरेश तळवलकर , पं . राजाभाऊ काळे , कलापिनी कोमकली अशा दिग्गजांनी हजेरी लावली . तसेच हा महोत्सव आपल्या गायन, वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवला . त्याच उंचीचा प्रत्यय यावर्षीही या संगीत महोत्सवात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने आला . रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पं. पणशीकर यांच्या संगीत मैफिलीला रसिकांनी दाद दिली. तसेच रसिकांनी आपलीही गाण्याची समज गेल्या बावीस वर्षांत वाढली असल्याचा प्रत्यय यावेळी दिला.

पं. रघुनंदन पणशीकर यांनी 'यमन' रागातील विलंबित तीन तालामध्ये ' मोहन मन' हा बडा ख्याल , त्यानंतर ' सखी येरी आली ' ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली . त्यानंतर नायकी कानडा पारामामध्ये रुपक तालातील मेरो पिया ही बंदिश सादर केली.

रसिकाग्रहास्तव ' मत्स्यगँधा ' नाटकातील ' गुंतता ह्रदय हे ' नाट्यपद सादर केले . तसेच रसिकांच्या मागणीनुसार किशोरी आमोणकर यानी अजरामर केलेली ' अवघा रंग एक झाला ' ही भैरवी त्यांनी सादर करून संगीत महोत्सवाचा समारोप केला . त्यांच्या मैफिलीला तबला साथ चारुदत्त फडके , हार्मोनियम साथ उदय कुलकर्णी व तानपुरा साथ पल्लवी पिळणकर , रविराज काळे यांनी केली .

प्रारंभी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या पं . जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्रातील पं . समीर दुबळे यांचे विद्यार्थी असलेल्या मनोज मेस्त्रींचे शास्त्रीय गायन झाले . मनोज मेस्त्री हे कणकवलीतीलच असून त्यांच्या संगीत मैफिलीला कलारसिकानी उत्स्फूर्त दाद दिली . राग ' मधुवंती ' मधील विलंबित 'झुमरा ' तालातील ह्ल ए हो मोरे सईया ' हा बडा ख्याल गाऊन द्रुत तालातील 'सूनप्रिया अर्ज ' सादर केली .

त्यानंतर खमाज रागातील ' ना मानूंगी ' बंदिश - ठुमरी सादर केली . उस्ताद साईज परवेज यांचे शिष्य अर्जुन पटवर्धन यांनी सतारवादनात 'राजश्री ' रागातील रुपक तालात व द्रूत एकतालातील रचना सादर केली . त्यामुळे या संगीत महोत्सवाची रंगत आणखीनच वाढली. सूत्रसंचालन प्रा . डॉ . अनिल फराकटे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. समीर नवरे यांनी केले. यावेळी पं. समीर दुबळे यांच्यासह अन्य संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

 

Web Title: Rasht Mantra, Vasantrao Achrekar Pratishthan organized in Kankavali Classical Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.