सिंधुदुर्गातील रेशनिंग दुकानदारांचा दिल्लीत जंतर-मंतरवर घुमला आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:36 PM2022-08-03T12:36:22+5:302022-08-03T12:39:43+5:30
देशभरातील रेशनिंग व केरोसीन परवानाधारक दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत
सुधीर राणे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी आज, बुधवारी दिल्ली येथे जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलनात आवाज उमटवला. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलन केल्यानंतर देखील रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार देशव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने फक्त कमीशनमध्ये २० रूपये व विशेष दर्जा प्राप्त राज्यांसाठी ३७ रूपये कमीशनमध्ये वाढ केली. ही केलेली वाढ समाधानकारक नसून सर्व राज्यातल्या प्रतिनिधींनी या केलेल्या वाढीला आपला विरोध दर्शविलेला आहे.
देश पातळीवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कोरोना महामारीच्या काळात देशपातळीवरील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता धान्याचे अविरत वाटप केले. मात्र, याची दखल सरकारने न घेता, परवानाधारकांना कोरोना योद्धा घोषीत न करता, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या परिवाराला कोणताही मोबदला दिला नाही. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे गठीत केलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम अंतर्गत त्यांच्या अहवालावर ४४०रुपये कमीशन प्रति क्विंटल देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर भारत सरकारद्वारा टोलवाटोलवी करण्यात येत आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता ८ जून २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये देश पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना द्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत ४४० रूपये प्रति क्विंटल कमीशन देण्यात यावे . किंवा दरमहा ५०,००० निश्चित मानधन घोषित करावे. फक्त गहू , तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्य पदार्थावर १ किलो प्रति क्विंटल हॅण्डलिंग लॉस ( तूट ) देण्यावर सर्व राज्यांनी तत्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांबर गहू, तांदुळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळी दरमहा देण्यात याव्यात. आदी मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. देशभरातील रेशनिंग व केरोसीन परवानाधारक दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, कणकवली तालुकाध्यक्ष किशोर नारकर, सचिव सुदर्शन फोपे, बबन लोकरे, राजीव पाटकर, नितीन मुद्राळे, कान्होबा देसाई (मालवण), संजय मुळीक (सावंतवाडी), शैलेंद्र कुळकर्णी, मनोहर राणे, विनय केळकर, प्रदीप पारकर (देवगड), तात्या हाडये (वेंगुर्ले) आदी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र सदन मधील बैठकीला देखील या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.