रत्नागिरी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रारंभ २६ रोजी?
By admin | Published: October 15, 2015 11:56 PM2015-10-15T23:56:03+5:302015-10-16T00:01:59+5:30
जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच.
रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचा प्रारंभ आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. या कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी २६ आॅक्टोबर २०१५ हा दिवस निश्चित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत दौरा जाहीर झाला नसल्याने याबाबत प्रशासन स्तरावरून गुप्तता पाळली जात आहे. या कार्यक्रमाबाबतची तयारी रत्नागिरीत सुरू झाली आहे. तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विस्तारीकरण असले, तरी या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे. मुंबई व गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान रत्नागिरी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. रत्नागिरीचा विस्तार होत असून, येथील औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर हा विमानतळ विस्तारित करून येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. रत्नागिरीच्या या विमानतळावरून काही वर्षांपूर्वी छोट्या (पान १ वरून)
प्रवासी विमानांची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता स्थिती बदलली असून पुणे, मुंबई व गोवा येथे तत्काळ जाण्यासाठी उद्योजक व व्यावसायिक यांना रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू होणे महत्त्वाचे वाटते आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच.
शिवाय विमानसेवा नसल्याने उद्योजक याठिकाणी येण्यास नाराज आहेत. याचा विचार करूनच शासनाने या विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) गडकरींचे सुतोवाच खरे ठरणार!
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरीत विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे गडकरी यांचे ते वक्तव्य विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने खरे ठरणार आहे.
रनवे १८०० मीटर्सनी वाढणार...
गोवा व मुंबई दरम्यान सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी तटरक्षक दलासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.
तटरक्षक दलाच्या विमानांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे. राज्यात व देशातील अन्य काही ठिकाणचे विमानतळ तटरक्षक दलाकडे सोपविण्यात आली आहेत.
मात्र, तेथून प्रवासी विमान वाहतूकही सुरू आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, असा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.