रत्नागिरी जिल्हा हादरला...!
By admin | Published: August 4, 2016 01:13 AM2016-08-04T01:13:43+5:302016-08-04T01:21:21+5:30
महाडमधील दुर्घटनेत राजापूर - बोरिवली गाडीचा समावेश
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर-महाड रस्त्यावरील सावित्री नदीचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या मार्गावर धावणाऱ्या जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या एस. टी.च्या दोन गाड्यांना जलसमाधी मिळाली आहे. दोन्ही गाड्यांमध्ये प्रत्येकी नऊ प्रवासी व चालक वाहकांसह एकूण २२ जण बेपत्ता आहेत.
महाडमधील दुर्घटनेत राजापूर - बोरिवली गाडीचा समावेश असल्याने तालुक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दिवसभर त्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शोधमोहिमेचे काम त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून सुरुच राहिले. मात्र, उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होवू शकला नव्हता. दरम्यान, ही बातमी चिपळूण आगारात वाहतूक नियंत्रक सिद्धार्थ मोहिते यांना समजताच त्यांनी महामार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या चालक-वाहकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन सतर्क केले. मोहिते हे या वाहन चालकांसाठी देवदूत बनले.
गुहागर तालुक्यातील जांभारी गवळीवाडी येथील आजारी रघुनाथ मिरगल यांना मुंबईहून पाहण्यासाठी आलेली मुलगी संपदा संतोष वाजे (वय ३७) हिच्यासह नऊजण महाड येथील पूल अपघातात बेपत्ता झाले आहेत. (प्रतिनिधी)