रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल
By admin | Published: May 11, 2017 11:30 PM2017-05-11T23:30:44+5:302017-05-11T23:30:44+5:30
रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : उन्हाळी सुटी पडल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच मुंबई व पुण्यातून मूळ कोकणवासीही त्यांच्या कुटुंबियांसह गावी आल्याने रेल्वे, एस. टी. बस यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने भरून वाहात आहे. पर्यटनस्थळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. या गर्दीने रत्नागिरी हाऊसफुल्ल झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचा हंगाम ऐन भरात आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे पर्यटक आता कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटनाबरोबरच फळांचा राजा हापूसचा स्वाद घेणेही यामुळे पर्यटकांना शक्य होत आहे. अनेक पर्यटक रत्नागिरी व जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमधून हापूसची खरेदी करून आपल्या गावी नेत आहेत.
कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास गेल्या काही काळात वेगाने सुरू झाला आहे. तसेच स्थानिक लोकही पर्यटन व्यवसायाबाबत जागरुक झाले आहेत. या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगारासाठी मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढाही आता बराच कमी झाला आहे. जिल्ह्यात अनेक नावाजलेली पर्यटनस्थळे आहेत. त्यातच काही नवीन ठिकाणेही पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्टस, बॅकवॉटर सफारी, स्कुबा डायव्हिंगसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
अनेक ठिकाणी कोकणी, मालवणी रुचकर जेवण देणारी हॉटेल्सही उदयाला आली आहेत. लॉजिंगची सुविधाही घरोघरी न्याहरी निवासच्या माध्यमातून होऊ लागल्याने पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे आकर्षित झाले आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावस या नेहमीच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहेच, परंतु गणेशगुळे, आरे-वारे बीच, गुहागरचा बीच, हर्णै, परशुराम व अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
जिल्ह्यात येणारे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्यावर बेहद खूश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पर्यटकांची ही गर्दी येत्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटक व मुंबईकर यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोकणी मेवा, खाद्य पदार्थ, सुका मेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. येत्या शनिवारीही शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांची जिल्ह्यातील गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. पर्यटकांना चांगले मासे खाता यावेत, यासाठी हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. पर्यटकांची ये-जा वाढल्याने रस्त्याच्या कडेला हापूसची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहाळ्यांना पसंती : हापूस खरेदीत वाढ
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांनाही येथील कोकणी मेवा, ताजे मासे व त्याचे विविध प्रकार यांचा स्वाद घेण्यात अधिक आनंद असल्याचे दिसून येत आहे. शहाळ्याचे पाणी, कलिंगड व अननस विक्रीचे स्टॉल्स जागोजागी उभारण्यात आले आहेत.