गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभाग सज्ज
By admin | Published: August 15, 2016 12:29 AM2016-08-15T00:29:47+5:302016-08-15T00:29:47+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळ : मोबाईल अॅपव्दारे आरक्षण
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. मुंबईहून कोकणात २२११ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर रत्नागिरीहून मुंबईकडे परतीसाठी २०१७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणला विशेष पसंती दिली जात आहे. मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. याशिवाय महामंडळाने मोबाईल अॅपव्दारे आरक्षण प्रक्रिया सुरू केल्याने प्रवाशांचा त्याकडे वाढता कल आहे.
महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत राज्यातील अन्य जिल्ह्यातून चालक गाड्या घेऊन येत असतात, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. त्यामुळे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छता तसेच उपाहारगृहातून वाढीव खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. प्रत्येक आगारात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून वाहतूक नियोजनास त्याची मदत होणार आहे.
एखाद्या गावातील प्रवाशांनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. १ तारखेपासून कोकणात गाड्या येणार आहेत. याशिवाय नियमितच्या ८० गाड्या रत्नागिरी विभागातून धावणार आहेत. मुंबई सेंट्रल, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणामुळे मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी १०पासून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)