रत्नागिरी विभाग : एस. टी. महामंडळाला वावडे?
By admin | Published: October 14, 2015 11:31 PM2015-10-14T23:31:51+5:302015-10-15T00:37:27+5:30
तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्रास
मेहरुन नाकाडे-रत्नागिरी--प्रत्येक क्षेत्रात महिलावर्गाने आपले वर्चस्व स्थापित केले आहे. खासगी असो वा शासकीय क्षेत्रात पुरूषवर्गाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. राज्य परिवहन महामंडळामध्ये केवळ चालक वगळता अन्य सर्व पदांवर महिला कार्यरत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यापैकी विविध पदांवर ३१७ महिला काम करत आहेत. त्यामुळे महिलांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ ७.४ टक्के इतकीच आहे.एस. टी.मध्ये पाच सीटस् महिलांसाठी आरक्षित ठेवणाऱ्या एस. टी.च्या महामंडळात मात्र महिलांना नगण्यच स्थान असल्याचे दिसून येते. कारण केवळ ७.४ टक्केच महिलांना एस. टी. महामंडळाने सामावून घेतले आहे. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकपदी एक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक ४, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ३, वरिष्ठ कार्यादेशक १, वहातूक निरीक्षक १, भांडारपाल १, लेखाकार १, वरिष्ठ लिपीक/रोखपाल १०, लिपिक ७४, शिपाई ७, वाहतूक नियंत्रक १४, वाहक १४९, कारागीर ‘क’ २, सहाय्यक २१, स्वच्छक १२, सफाई कामगार ५ मिळून एकूण ३१२ महिला कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत.
महिलांना ३३ टक्के आरक्षण शासनाने दिल्याने विविध क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. वर्ग १च्या अधिकारीपदापासून अगदी सफाई कामगार या पदावर महिला काम करतात. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, सचोटी या गुणांमुळे घर सांभाळून नोकरीतील जबाबदारी त्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत. महिलांना ५० टक्के जागा देण्याची मागणी आहे. जर महिलांना ५० टक्के जागा दिल्या तर प्रत्येक क्षेत्रात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.
तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्रास
सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यत केवळ वाहक वगळता अन्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कामकाज करावे लागते. महिला वाहकांना रात्रवस्तीसाठी पाठवले जात नाही. त्यांना दिवसाची ड्युटी देण्यात येते. परंतु, पहाटे चार वाजलेपासून या महिलांना ड्युटीवर हजर व्हावे लागते. कौटूंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पहाटे घर सोडावे लागते. अनेकवेळा सलग आठ तास ड्युटी करावी लागते.चालकांच्या तुलनेत वाहकांची संख्या कमी असल्याने ओव्हरटाईम देखील करावा लागतो. अशावेळी अधिकची ड्युटी करून घरी पोहोचेपर्यत रात्र देखील होते. एकूणच तारेवरची कसरत करत या महिला कौटुंबिक व कार्यालयीन जबाबदारी सांभाळत आहेत.
चालकपदी पुरुषच
राज्य परिहवन महामंडळामध्ये चालक पदावर काम करण्यासाठी अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र, अवजड परवाना काढणाऱ्या महिलावर्गाची संख्या हातावर मोजण्याइतकीच आहे. अन्य राज्यात ही संख्या जास्त असली तरी महाराष्ट्रात ही संख्या अल्प आहे. त्यामुळे अद्याप तरी एस. टी.मध्ये चालक पदावर पुरूषवर्गाचीच मक्तेदारी राहिली आहे.
रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत.
विविध पदांवर केवळ ३१७ महिला.
सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत.