रत्नागिरीला दरवर्षी ३00 कोटी देऊ
By admin | Published: January 29, 2016 11:25 PM2016-01-29T23:25:37+5:302016-01-29T23:58:01+5:30
चंद्रकांत पाटील : मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यांना जोडणार
रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी हजार कोटी निधी देणे राज्य सरकारला शक्य नाही. मात्र, ३०० ते ४०० कोटी निधी रस्त्यांसाठी देता येईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चौपदरी होणारा मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यातील सहा, आठ पदरी महामार्गांशी जोडण्याचाही गडकरी यांचा विचार असल्याचेही चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले.
निवळी - रत्नागिरी येथे चौपदरीकरणाच्या भूमिपूजन संमारंभात पाटील बोलत होते. राज्यात २० हजार किलोमीटर रस्त्यांची गरज आहे. त्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करून निधीची तरतूद करावी लागेल, असेही पाटील म्हणाले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याची मागणी आपण मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. आज चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले. येत्या महिना-दोन महिन्यात भूसंपादन होईल. चौपदरीकरण सुरू होईल. त्याच्या भूसंपादनासाठी कोठेही बळाचा वापर होणार नाही. कोकणच्या विकासाचा हा महामार्ग चौपदरी झालाच पाहिजे. त्याचबरोबर रेवस-रेडी हा ४७५ किलोमीटरचा सागरी महामार्गही झाला पाहिजे. हा सागरी महामार्ग राज्याने केंद्राकडे हस्तांतरीत करावा व त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गीते यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे केली.
चौपदरीकरणाची सुरूवात रत्नागिरीतून होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. जिल्हा प्रशासनाचे उत्तम सहकार्य यासाठी मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला हा महामार्ग चौपदरीकरणानंतर आनंदी प्रवासाचा मार्ग ठरावा, अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील कामाच्या प्रगतीचे त्यांनी कौतुकही केले. पालकमंत्री वायकर म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी, दुरुस्तीसाठी ५ हजार कोटींची गरज आहे. दरवर्षाला १ हजार कोटी रुपये मिळाले तर रस्ते चांगले करता येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)