रत्नागिरीकरांनी सायंकाळी अनुभवली ‘मुग्ध’ मैफल

By admin | Published: December 23, 2014 10:12 PM2014-12-23T22:12:15+5:302014-12-23T23:44:12+5:30

विलंबीत, द्रूत, शास्त्रीय गायनाने सामंत यांनी सुरुवात केली. सखी मोरी रुम झूम या दुर्गा राग सादर

Ratnagiri experienced the evening 'infatuated' concert | रत्नागिरीकरांनी सायंकाळी अनुभवली ‘मुग्ध’ मैफल

रत्नागिरीकरांनी सायंकाळी अनुभवली ‘मुग्ध’ मैफल

Next

रत्नागिरी : ललित गौर रागापासून सुरु झालेली व एकापेक्षा एक सरस गीतांनी रंगलेली मुग्धा भट - सामंत यांची बैठक रसिकांच्या उपस्थितीत पार पडली. कर्नाटकी गानशैलीचा प्रत्यय व शब्दप्रधान गायकी पहाडी आवाजात रसिकांपर्यंत पोहोचल्यानंतर होणारा परिणाम व त्यातून मिळणारा मंत्रानंद भट यांच्या मैफलीतून रसिकांना मिळाला.
विलंबीत, द्रूत, शास्त्रीय गायनाने सामंत यांनी आपल्या मैफलीला सुरुवात केली. सखी मोरी रुम झूम या दुर्गा रागातील सादर केलेल्या गीताने वेगळाच आनंद मिळाला. ठुमरी, अभंग, नाट्यगीते, भैरवी अशा गीतांनी सुमारे अडीच तास ही मैफल रंगली. यावेळी सामंत यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर झालेल्या मृच्छकटीक या नाटकातील ‘खरा तो प्रेमा’ या गीताचा संस्कृतमधील बाज त्याच थाटात सादर केला. नेहमी खरा तो प्रेमा ऐकणाऱ्या रसिकांसाठी हा अनुभव वेगळा असला तरी पदाची चाल व शब्दांवरील हुकुमत यामुळे उपस्थितांनी भट यांना दाद दिली.
याबरोबरच विकल मन आज, संत सोयरोबा नाथांच्या अभंगाचा साज व अच्युता अनंता या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. हेरंब जोगळेकर यांनी तबला, तर संवादिनीवर मधुसूदन लेले यांनी उत्कृष्ट साथ दिली.
दरम्यान, या मैफलीच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन रत्नागिरीत संगीत महोत्सव भरविण्याची आपली इच्छा होती. एकाच वेळी नाणावलेल्या कलाकारांना तीन दिवस वेळ मिळेल न मिळेल. मात्र, या महोत्सवाची सुरुवात स्थानिक कलावंतांपासून होत असल्याचा आनंद वेगळा आहे. अशा शब्दांत अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)


जिल्हा नगर वाचनालयातर्फे गायिका मुग्धा भट-सामंत यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पटवर्धन यांनी ग्रंथालये नेटने जोडण्याची आपली कल्पना असून, त्याला लवकरच मूर्त स्वरुप प्राप्त होईल व त्यातून ग्रंथालयाच्या समृद्धीत भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. आनंद पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह चंद्रशेखर पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष प्रभू व मान्यवरांच्या उपस्थितीत मैफलीचे उद्घाटन झाले.
पहाडी आवाज व लिलया सादर केलेली पदे यांना तानपुरा, तबला व संवादिनीच्या साथीतून मिळणारी जोरकस साथ अभंगाच्या साथीला राजा केळकर यांची पखवाज या साऱ्या साथसाजाला भट यांच्या आवाजाने अधिक गोडवा आणला. ही मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. गंगुबाई हनगल, शोभा गुरटू यांच्या धाटणीतील भट यांनी सादर केलेल्या गीतांची मैफल लक्षणीय ठरली.
या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय गीते सादर करण्याचा आग्रह शिष्यवर्गाने केल्यामुळे व या कार्यक्रमात आपलीही शास्त्रीय गीत गाण्याची इच्छा असल्यानेच आपण त्रिताल, झपताल, दादरा या अंगाने गाणी सादर केल्याचे सामंत यांनी सांगितले. रसिकांनी दिलेल्या व आयोजकांनी सादर केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

Web Title: Ratnagiri experienced the evening 'infatuated' concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.