विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा
By admin | Published: January 15, 2015 10:02 PM2015-01-15T22:02:20+5:302015-01-15T23:30:53+5:30
सांस्कृतिकमध्ये अव्वल : सलग सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कोकण विभागीय महसूल क़्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत येथील महसूल विभागाने सलग सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद राखत सांस्कृतिक स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. सिंधुदुर्ग येथे १३व्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मुंबई शहरासह, उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि आताचा नवीन जिल्हा पालघर अशा सात जिल्ह्यातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. यात खो - खो, थ्रो बॉल, रिले, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांबरोबरच वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांवर वर्चस्व राखत येथील महसूल विभागाच्या महिला चमूने खो - खो, थ्रो बॉल, रिले (१०० बाय ४ आणि ४०० बाय ४) अशा सांघिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर पुरूष स्पर्धकांनी खो - खो, व्हॉलीबॉल, रिले (१०० बाय ४ आणि ४०० बाय ४) या सांघिक खेळांचे उपविजेतेपद मिळवले. वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्येही येथील महिला व पुरूष स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. एकंदरीत सर्वच स्पर्धांमध्ये अव्वल ठरलेल्या रत्नागिरी महसूल विभागाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद खेचून आणले. तिसऱ्या दिवशी कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अनिल सावंत यांनी बक्षीस स्वीकारले. यावेळी रत्नागिरीच्या सर्व स्पर्धकांनी विजयाचा जल्लोष केला.या स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्या प्रेरणेबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अनिल सावंत यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. (प्रतिनिधी)