रत्नागिरीत घरफोड्यांचे सत्र सुरूच
By admin | Published: May 4, 2017 12:25 AM2017-05-04T00:25:40+5:302017-05-04T00:25:40+5:30
साळवी स्टॉपजवळ घरफोडी; सोने-चांदीचे दागिने लंपास
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री साळवी स्टॉप येथे हॉटेल सिंधुदुर्गजवळील एका गृहसंकुलात सदनिका फोडून चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इरत्ना विठ्ठलराव मामीलवाड (वय ५८, रा. संजय प्रभूसावंत यांचे घर, साळवी स्टॉप, रत्नागिरी, मूळ रा. आंबुलगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
मामीलवाड हे ३० एप्रिल २०१७ रोजी रात्री नऊ वाजता कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते बुधवारी (दि. ३ मे) सकाळी साडेआठ वाजता बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडलेल्या स्थितीत आढळला. आतील कपाटातून सोने व चांदीचे दागिने तसेच चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना आढळून आले. पाच गॅ्रम सोन्याचे वळे, सोन्याची
नथ, तसेच सुमारे एक किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, वस्तूू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
चोरी झालेल्या वस्तूंची किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही दुकाने चोरट्यांनी फोडली होती. काही लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यावेळचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सापडले होते. त्यावरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. चोरीचे प्रकार वाढल्याने शहर परिसरात घरे व दुकानफोडी करणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
आरोग्यमंदिर परिसरातही घरफोड्या!
साळवी स्टॉप येथील घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असला, तरी मंगळवारी रात्री शहरातील आरोग्य मंदिर परिसरातील आणखी काही ठिकाणच्या इमारतींमध्ये फ्लॅट फोडण्यात आले व बाजूच्या फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसांत नोंद झालेली नाही.