रत्नागिरी हापूस युरोपला रवाना
By admin | Published: April 2, 2016 12:56 AM2016-04-02T00:56:51+5:302016-04-02T00:57:10+5:30
उष्णजल प्रक्रियेला मान्यता : निर्णय रखडला
रत्नागिरी : फळमाशीमुळे युरोपीय देशांनी बंदी घातलेल्या हापूसची यावर्षी परदेश वारी निश्चित झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांनी ५०० किलो हापूस युरोपला पाठविण्यासाठी मुंबईला पाठविला आहे. तेथून पुढील प्रवास सुरू झाला आहे. फळमाशीमुळे उष्णजल प्रक्रियेचा निकष निश्चित झाला आहे. अपेडाने याबाबचा अहवाल फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविला आहे. मात्र, आंब्याची निर्यात सुरू झाली तरी अद्याप निर्णय न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
फळमाशीमुळे युरोपीय देशांनी दोन वर्षांपूर्वी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, गतवर्षी फळमाशी नष्ट होण्यासाठी उष्णजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली. उष्णजल प्रक्रियेंतर्गत ४८ अंश सेल्सियसला ६० मिनिटे आंबा ठेवला तर फळमाशीच्या अळ्या मरून जातात. त्यानंतर निर्यातीस युरोपीय देशांनी मान्यता दिली होती.
मात्र गतवर्षी संशोधनास झालेला उशीर शिवाय अवकाळी पावसामुळे पिकाच्या उत्पादनात झालेली घट यामुळे आंबा निर्यात होऊ शकला नाही. गतवर्षी आंबा काजू बोर्डातर्फे करण्यात आलेल्या संशोधनात ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे ठेवलेला आंबा निर्यातीस योग्य असल्याचा अहवाल विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘अपेडा’कडे पाठविला. अपेडाने फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला आहे. मँगोनेट कार्यशाळेत निर्णयाची अपेक्षा होती, मात्र अद्याप त्याबाबत निर्णय नसल्यामुळे सध्यातरी रत्नागिरीच्या बागायतदारांना वाशी येथील व्हेपरी ट्रीटमेंटद्वारे (बाष्पजल प्रक्रिया)
आंबा निर्यात करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
उत्पादनात घट
रत्नागिरी हापूसला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र उत्पादनातील घट यामुळे मागणीप्रमाणे निर्यात होऊ शकत नाही. यावर्षी हापूसचे प्रमाण कमी असल्याने परदेशात आंबा मागणीप्रमाणे पोहचू शकत नसल्याचे दिसत आहे. परदेशातील हापूसची मागणी पूर्ण करण्यासाठी हापूसचे पीक अधिक येणे गरजेचे आहे.
समीर दामले यांच्याकडून ५०० किलो आंबा
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांचा ५०० किलो आंबा युरोपला जाणार असून, रत्नागिरी पणन केंद्रात रायपनिंग प्रक्रिया करून बाष्पजल प्रक्रिया करण्यासाठी वाशी येथे पाठविण्यात आला आहे. तेथून आंबा विमानाने युरोपला निर्यात होणार
आहे.