रत्नागिरी आयटीआयचे विद्यार्थी ‘गॅस’वर
By admin | Published: October 9, 2015 10:08 PM2015-10-09T22:08:45+5:302015-10-09T22:08:45+5:30
निकालाची प्रतीक्षा : यंदा नोकरी मिळण्याची आशा धुसर
रत्नागिरी : आॅक्टोबरची दहा तारीख उलटून गेली तरी आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांची पुणे आणि मुंबईतील सहा कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून निवड झाली आहे. मात्र, त्यासाठी १४ आॅक्टोबरपूर्वी गुणपत्रक आवश्यक असल्याने आता या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रस्तरावरील एक व दोन वर्षे कालावधीचे जवळपास २५ अभ्यासक्रम शिकवले जातात. गेल्या वर्षीपासून अभ्यासक्रम पद्धत बदलली असून, वार्षिक ऐवजी आता सत्र पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षापासूनच निकाल उशिरा लागू लागले आहेत. यावर्षीही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात झाल्या. मात्र, नव्या ‘ओएमआर’ पद्धतीत पेपरही स्पर्धात्मक परीक्षेच्या पद्धतीने तपासले जाऊ लागले आहेत. त्यामुळे निकाल अनियमित झाले आहेत. सर्वच आयटीआयचे दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणारे निकाल, आॅक्टोबरची १० तारीख उजाडली तरी अद्याप जाहीर झालेले नाहीत. परीक्षेच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
त्यातच शेवटच्या सत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी विविध कंपन्या परीक्षेपूर्वीच मेळावे घेतात. यात निवड झालेल्यांना १६ आॅक्टोबरपासून ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून हजर करून घेतात. यावर्षी या आयटीआयमधील ११० विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे, तर ५० विद्यार्थ्यांना येथील कंपन्यांत सामावून घेण्यात आले आहे.
तसेच पुणे, मुंबई येथे झालेल्या भरतीतही परस्पर विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली असून, त्यांची निवड झाली आहे. मात्र, आता निकालपत्र हाती मिळाल्याशिवाय हे विद्यार्थी हजर होऊ शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत आपल्या गुणपत्रकासह कंपनीत हजर व्हायचे आहे. मात्र, अद्याप त्यांचे निकालच लागलेले नाहीत, तर गुणपत्रक कसे सादर करणार, अशी चिंता या विद्यार्थ्यांसह पालकांनाही भेडसावू लागली आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करीत आहेत. (प्रतिनिधी)
स्वरूप बदलले : पेपर काळजीपूर्वक तपासले जात असल्याने विलंब
गेल्या वर्षीपासून स्पर्धात्मक परीक्षांप्रमाणे आयटीआयच्या पेपरचे स्वरूप करण्यात आले आहे. त्यामुळे पेपर तपासण्याची पद्धत सोपी असली तरी विद्यार्थ्याने स्वत:चे नाव लिहिताना क्षुल्लकशी चूक केली तरी त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे पेपर काळजीपूर्वक तपासले जात असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कंपन्यांना मुदत वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
- एस. टी. बाबर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी
निकालाचा पत्ताच नाही
रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांचे मिळून एकूण ७०० विद्यार्थी आहेत. तसेच पाली, करंजारी येथील आयटीआयचे २०० विद्यार्थी अशा एकूण ९०० विद्यार्थ्यांनी रत्नागिरी आयटीआय केंद्रावर परीक्षा दिली आहे.