रत्नागिरी पॅटर्न राज्यभर राबविणार
By admin | Published: February 12, 2016 10:23 PM2016-02-12T22:23:41+5:302016-02-12T23:50:26+5:30
राम शिंदे : पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात घोषणा
रत्नागिरी : सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये सुरू केलेले स्वागत कक्ष, तसेच जिल्हा पोलीस दलाला पोलीसपाटील व पोलीस मित्र, सागररक्षक यांचे मिळणारे सहकार्य आदर्शवत आहे. त्यामुळे माणसातला पोलीस व पोलिसातला माणूस या रुपाचे खरेखुरे दर्शन आपल्याला या जिल्ह्यात झाले. पोलीस खात्याच्या उपक्रमाचा हा ‘रत्नागिरी पॅटर्न’ राज्यभरात राबवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज (शुक्रवारी) येथे केली.
रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित सागरी सुरक्षा जनजागृती पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरी विभाग तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक उमेश शेट्ये आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील १३ गावे दारूमुक्त करण्यात आली, ही बाब अत्यंत चांगली असून, जिल्हा पोलिसांच्या या कामगिरीची मंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक बुरडे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था ही प्रगती व विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वांनीच आम्हाला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा उपयोग केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात ६८७ सागररक्षक आहेत. १० संस्थांचे २०० लोक सागरी सुरक्षेसाठी बॅँ्रड अॅम्बेसेडर म्हणून काम करीत आहेत. यावेळी जिल्हा पोलिसांना मदत करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविणार
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासाला खूप वाव आहे. काही ठराविक भागांचा पर्यटन विकास झाला आहे. मात्र, शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन विकास होऊ शकतो. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा बनविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.