जादा गाड्यांसाठी रत्नागिरी सज्ज
By admin | Published: October 6, 2016 10:08 PM2016-10-06T22:08:13+5:302016-10-07T00:20:27+5:30
मार्ग परिवहन महामंडळ : नऊ आगारातून १४१ गाड्यांचे नियोजन
रत्नागिरी : दीपावलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. दीपावलीनिमित्त नऊ आगारातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, मिरज, लातूर मार्गावर १४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
प्रथम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांना दिवाळीची दोन आठवडे सुटी मिळते. या दिवसात पर्यटकांचीही संख्या वाढते. शिवाय सुटीला मुंबई अथवा अन्य शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच पर्यटन हंगामही आता सुरु होत असल्याने कोकणात पर्यटकांचीही वर्दळ वाढणार आहे.
दापोली आगारातून कल्याण, ठाणे, मुंबई, भार्इंदर, बोरिवली मार्गावर बारा, तर खेड आगारातून ठाणे, मुंबई, लातूर मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून सर्वाधिक ३० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, चिंचवड, परळी, लातूर, तासगाव, मिरज, बोरिवली, मुंबई, ठाणे, गोंदवले मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातून अक्कलकोट, बोरिवली, भांडूप, विरार, स्वारगेट मार्गावर बारा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
देवरूख आगारातून स्वारगेट, अक्कलकोट, कोल्हापूर, स्वारगेट, कल्याण मार्गावर ९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून २० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आंबेजोगाई, इचलकरंजी, उस्मानाबाद, इस्लामपूर, मिरज, स्वारगेट, लातूर मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
लांजा आगारातून १२ गाड्यांचे नियोजन केले असून, तुळजापूर, बोरिवली, पुणे मार्गावर या जादा गाड्या धावणार आहेत. राजापूर आगारातून २४ गाड्या सोडण्यात येणार आहे.
बोरिवली, तुळजापूर, लातूर, आंबेजोगाई, शिर्डी, सोलापूर मार्गावर गाड्या धावणार आहेत. मंडणगड आगारातून १४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नालासोपारा, मुंबई, कल्याण, स्वारगेट, कोल्हापूर, उस्मानाबाद मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे कोकणातील भाविक वारीला जात नाहीत. परंतु कार्तिकी एकादशीला कोकणातून काही ठिकाणांहून वारी निघते. शिवाय सुटीमुळे पंढरपूरला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अक्कलकोटला भाविक जात असल्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोकणात विदर्भातील मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून, थेट गाड्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आली दीपावली... : कोकणात येणार लाखो लोक
दीपावलीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही रत्नागिरी एस. टी. विभाग दीपावलीसाठी सज्ज झाला आहे. यंदा विविध मार्गांवर एस. टी. १४१ जादा गाड्या सोडणार आहे.