रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सहाजणांचे यश
By admin | Published: June 7, 2015 12:48 AM2015-06-07T00:48:23+5:302015-06-07T00:52:21+5:30
ब श्रेणी प्राप्त : आकाशवाणीच्या स्वरचाचणी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी : रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाजणांची आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक म्हणून निवड झाली आहे. रत्नागिरीचे अभिषेक भालेकर, प्रेरणा दामले, प्रसाद शेवडे आणि अभिजित नांदगावकर, तर सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नील गोरे आणि वैदेही करंबेळकर यांना आकाशवाणीची ‘बी ग्रेड’ प्राप्त झाली आहे.
मे महिन्यात आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, सुगम संगीत’ गायनाची स्वरचाचणी घेण्यात आली. रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून एकूण ३४ जणांनी ही स्वरपरीक्षा दिली होती. सुगम व नाट्यसंगीतासाठी सहाही कलाकार उत्तीर्ण झाले आहेत. सुगमसंगीतामध्ये अभिषेक भालेकर, प्रेरणा दामले, प्रसाद शेवडे, अभिजित नांदगावकर आणि वैदेही करंबेळकर, तर नाट्यसंगीतामध्ये प्रेरणा दामले आणि स्वप्नील गोरे हे उत्तीर्ण झाले आहेत.
या स्वरचाचणीसाठी अभिजित नांदगावकर, अभिषेक भालेकर, वैदेही करंबेळकर, स्वप्नील गोरे, प्रसाद शेवडे यांना रत्नागिरीतील आकाशवाणीचे मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी या साऱ्यांनी अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायली. या स्वरपरीक्षेसाठी एकूण १५ अनरेकॉर्डेड गाणी गायची होती. तशी १५ गाण्यांची यादी अर्जासोबत जोडायची होती. एक स्वत:च्या आवडीचे व दुसरे परीक्षकांनी सांगितलेले अशी दोन गाणी स्वरचाचणी दरम्यान गायकांनी गायली.
स्वरचाचणी आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मे महिन्यात घेण्यात आली. केवळ तानपुरा आणि तबला या दोन वाद्यांवरच गायक कलावंतांचा या स्वरचाचणीसाठी कस लागतो. या सर्व कलावंतांचे रत्नागिरीतील संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. (प्रतिनिधी)