रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:38 PM2018-07-18T16:38:38+5:302018-07-18T17:03:07+5:30
शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाºयांना आज खडसावले.
रत्नागिरी : शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
आज मिऱ्यांवासीयांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले. पत्तन विभाग निद्रिस्त असल्याचा आरोप करतानाच याठिकाणी केवळ दगड टाकण्याचेच काम केले असल्याचे आप्पा वांदरकर यांनी सांगितले.
मिरकरवाडा येथे ब्रेकवॉटरच्या दुसऱ्या टप्प्याच्या अर्धवट कामामुळे संपूर्ण मिऱ्या गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पाहाणी करावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी याबाबत पत्तन अधिकाऱ्यांकडे विचारणा करता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. येथील काम का रेंगाळले, यावर या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी मिळाला होता. मात्र, डिसेंबर २०१६पासून कंत्राटदार न मिळाल्याने काम रेंगाळल्याचे सांगितले.
शासनाने निधी देऊन दीड वर्ष झाले. पैसे देऊनही काम नाही, मग काय करत होतात? अशा शब्दात प्रदीप पी. यांनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कामासाठी रस्ता मिळत नाही, ग्रामस्थ काम करू देत नाहीत, अशी कारणे या अधिकाऱ्यांनी सांगताच, याबाबत आपण लोकशाही दिनात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार का केली नाहीत, असे विचारले.
पंधरामाड येथील बंधाºयासाठी १६ कोटीचा खर्च झाला. एवढा खर्च होऊन केवळ पाच वर्षातच ते काम परत करावे लागत असेल तर त्याचा उपयोग काय, असेही प्रदीप पी. म्हणाले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय सालीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा धोका मिरकरवाडा येथील ब्रेकवॉटरमुळे झाल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावर प्रदीप पी. यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांना हे काम २००५च्या आराखड्यानुसार झालेले असले तरी त्याची रचना चुकीची झालेली आहे, की कामच झालेले नाही, याबाबत एखाद्या तंत्रज्ञाकडून माहिती घ्या तसेच मिरकरवाडा येथील या बंधाऱ्याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याने तसे त्वरित सर्वेक्षण करण्यासाठी डब्ल्यूपीआरएस संस्थेला सांगा, अशा सूचना दिल्या.