रत्नागिरीच्या वाट्याला ७९ कोटी ५३ लाख
By Admin | Published: June 7, 2015 12:51 AM2015-06-07T00:51:23+5:302015-06-07T00:51:56+5:30
नुकसानभरपाई जाहीर : हेक्टरी २५ हजार; ३३ कोटी ८१ लाखांचा पहिला हप्ता
रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाची नुकसानभरपाई म्हणून जाहीर झालेल्या रकमेतून ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. त्यापैकी ३३ कोटी ८१ लाख रुपये निधीचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाईचे वितरण करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी व मार्चमध्ये सतत दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ११ हजार ९६.४१ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले. थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे २०१२ मध्ये झालेल्या आंबा पिकाच्या नुकसानासाठी भरपाई देण्यात आली होती. उर्वरित ३० कोटींचा निधी परत गेला होता. वास्तविक यावर्षी अवकाळीचा फटका सातत्याने आंबा पिकाला बसला. पीक उत्पादन अत्यल्प असतानाही दर टिकणे अपेक्षित होते. आंब्याचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी गुंतवलेली रक्कमदेखील वसूल झाली नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमाफीची मागणी केली होती, परंतु या मागणीकडे डोळेझाक करीत अल्प नुकसानभरपाई जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)