सतीश सावंत यांच्यावर केलेल्या टीकेला राऊळ यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 05:57 PM2021-01-07T17:57:01+5:302021-01-07T17:59:15+5:30
Politics Sindhudurg- सतीश सावंत स्टंटबाजी करतात हे म्हणणे हास्यापद आहे, असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी महेश सारंग यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला.
सावंतवाडी : महेश सारंग यांना स्टंटबाजीचा अर्थ तरी माहीत आहे का?, माडखोलमध्ये सुरू होत असलेले प्रशिक्षण केंद्र हे सिंधुदुर्ग बँक, भगीरथ प्रतिष्ठान व देसाई डेअरी फार्म माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. त्यात सतीश सावंत स्टंटबाजी करतात हे म्हणणे हास्यापद आहे, असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी महेश सारंग यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला.
सारंग यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आहे. नीतेश राणे व त्यांच्या कुटुंबाला खूश करण्यासाठी सारंग करत असलेले खटाटोप म्हणजे खरी स्टंटबाजी आहे, असेही राऊळ यांनी सांगितले..
महेश सारंग यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून उत्तर दिले. राऊळ यांनी म्हटले आहे की, भगीरथ प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे जिल्हा बँक विविध उपक्रम राबवित आहे.
कदाचित हे महेश सारंग यांना माहीत नसेल. कारण सहकारी संस्थांचा व सारंग यांचा तसा दुरान्वयेही संबंध नाही. त्यांचा संबंध ठेकेदारी व्यवसायाशी आहे. सारंग हे कोलगाव दुग्ध उत्पादक संस्थेवर काम करतात. या संस्थेची आज अवस्था काय आहे, यासाठी एकदा वेळ काढून त्यांनी अवलोकन करावे तर त्याचा फायदा त्यांना व गावातील शेतकऱ्यांना होईल.
महेश सारंग यांना माहितीचा अभाव आहे. त्यामुळे ते चुकीची माहिती देत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे कणकवलीतील दूध डेअरी. ही डेअरी खूप जुनी आहे. त्यामुळे त्यांचे नेते दुग्ध विकासमंत्री होते हे खरे पण दूध डेअरी त्यांनी बांधलेली नाही. गेली कित्येक वर्षे कणकवलीतील डेअरी पूर्ण बंद अवस्थेत आहे व ती नीतेश राणे यांच्या मतदारसंघात असल्याने चालू करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे एकदा जाहीर करावे.
त्यामुळे सारंग यांनी सतीश सावंत काय करतात याचा विचार न करता आपण काय केले पाहिजे याचा विचार करावा व सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी सहकाराचा अभ्यास करावा. आपल्या दूध संस्थेवर लक्ष केंद्रित करून तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राऊळ यांनी म्हटले आहे.
...तर ४५०० शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील
महेश सारंग यांना खरीच शेतकऱ्यांबद्दल कळकळ असेल तर त्यांचे नेते नीतेश राणे यांनी गोकुळला बाजूला करून प्रतिभा दूध डेअरी जिल्ह्यात आणली. त्या डेअरीने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांच्याकडून २ कोटी ६६ लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे असून ही जबाबदारी नीतेश राणे यांनी घेतली आहे. ती रक्कम देण्यासाठी सारंग यांनी प्रयत्न केले तर ४५०० शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील व त्याचा ठेकेदारी व्यवसायात त्यांना उपयोग होईल, असेही राऊळ यांनी म्हटले आहे.