सिंधुदुर्ग बाजार समितीच्या सभापतिपदी रावराणे

By admin | Published: October 15, 2015 11:53 PM2015-10-15T23:53:55+5:302015-10-16T00:02:01+5:30

उपसभापतिपदी राजन परब : दोन्ही पदे काँग्रेसकडेच; राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद नाही

Ravana has been appointed as the Chairman of Sindhudurg Market Committee | सिंधुदुर्ग बाजार समितीच्या सभापतिपदी रावराणे

सिंधुदुर्ग बाजार समितीच्या सभापतिपदी रावराणे

Next

 सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी तुळशीदास रावराणे, तर उपसभापतिपदी राजन परब यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना आपल्याला उपसभापतिपद न दिल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त करीत सभापती निवड ठिकाणावरून माघारी परतले.दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी दाजी खताळ यांनी सभापती व उपसभापतींच्या नावाची घोषणा करताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला तीन आणि अपक्षांना एक जागा मिळाली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.४५ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दाजी खताळ यांनी संचालक मंडळाच्या बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचा विषय आल्यानंतर काँग्रेसच्या अरविंद रावराणे (संचालक) यांनी तुळशीदास रावराणे यांचे नाव सुचविले, तर या नावाला प्रकाश राणे यांनी अनुमोदन दिले. या नावाला कुणीही विरोध दर्शविला नसल्याने सभापतिपदी तुळशीदास रावराणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
तर उपसभापतिपदाचा विषय अजेंड्यावर येताच काँग्रेस गोटातील संचालक मंडळाकडून राजन परब यांचे नाव सुचविले. त्याला अनुमोदनही देण्यात आले. मात्र, त्याचक्षणी राष्ट्रवादीच्या संचालकांनी याला विरोध दर्शवत कृष्णा करलकर यांनी अवधूत रेगे यांचे नाव सुचविले. याला स्नेहल पाताडे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राजन परब व राष्ट्रवादीचे अवधूत रेगे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करून घेत निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीच्या अवधूत रेगे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने उपसभापती राजन परब यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. नावे जाहीर होताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्यासह काही पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत माघारी परतले. या निवडीवेळी काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख अशोक सावंत, विकास कुडाळकर, राकेश कांदे, सुभाष दळवी, विनायक अणावकर, मामा कसालकर, बाबू बालम, प्रवीण परब, दिनेश साळगावकर, शरद कर्ले, आदी उपस्थित होते. (प्रतिक्रिया)




राष्ट्रवादीचे अवधूत रेगे यांनी उपसभापती पदासाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. याबद्दल रेगे यांचे अभिनंदन करतो. यापुढेही निवडणुका या आघाडी करूनच लढवू
- अशोक सावंत, उपजिल्हाध्यक्ष,
काँग्रेस सिंधुदुर्ग.


काँग्रेसने आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपभापतिपद न दिल्याने आम्ही नाराज नाही. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली. या तत्त्वानुसार उपसभापतिपद राष्ट्रवादीला मिळणे गरजेचे होते.
- व्हिक्टर डान्टस,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

प्राधिकरण क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीची दहा गुंठे जागा घेण्यात आली आहे. मार्केट यार्डसाठी २५ एकर जागा आरक्षित केली आहे. ओरोस येथे लवकरात लवकर मार्केट यार्डचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- राजन परब, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग

Web Title: Ravana has been appointed as the Chairman of Sindhudurg Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.