रिफायनरीसाठी अधिसूचना प्रस्तावित करा, देवगडमधील व्यापाऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:34 PM2020-08-13T18:34:46+5:302020-08-13T18:43:35+5:30
ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शासनाने या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करावी. अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शासनाने या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करावी. अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या भावना पोहोचाव्यात यासाठी देवगड तालुका व्यापारी संघाने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, शैलेश कदम, दिनेश पटेल, विजय नाडणकर, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला सर्व परिसरातून सुरुवातीला तीव्र विरोध होत होता. त्याचे कारण प्रकल्पाच्या बाजूने फार कमी माहिती लोकांपर्यंत पोहोचली. गैरसमज फार झाले. मात्र, आता लोकांच्या लक्षात येऊ लागले असून हा प्रकल्प झाल्यास संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळेल. सर्व प्रकारचा विकास या प्रकल्पातून होईल असे लोकांना वाटते.
नाणार येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने व्यावसायिकांना मोठी संधी समोर आहे. कोणतेही नवीन प्रकल्प वा विकासाच्या योजना येथे येत नाहीत. कृषीविषयक उत्पादनांसाठी येथे फार मोठा वाव नाही. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पर्यटन उद्योग गलितगात्र अवस्थेत आहे, असेही म्हटले आहे.