खरी कला दशावतारातच
By admin | Published: June 27, 2016 10:48 PM2016-06-27T22:48:09+5:302016-06-28T00:33:25+5:30
समीरा गुजर : कुडाळ येथील मान्सून महोत्सवाचा दुसरा दिवस
कुडाळ : कलाकार म्हणून आम्हाला जरा प्रसिध्दी मिळाली की, पुण्या मुंबईचे आम्ही कलाकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो मात्र खरी कला या कोकणातील दशावतार नाट्यकलेत आहे. ही कला मी जगभरात नेऊ शकले तर खऱ्या अर्थाने या मातीचे ऋण फेडले असे मानेन, असे प्रतिपादन अभिनेत्री समीरा गुजर यांनी चौथ्या मान्सून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘अश्विनी उद्धार’ हे संयुक्त दशावतार नाटक पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या या चौथ्या मान्सून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री समीरा गुजर व पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक गणेश भोगटे, एजाज नाईक, चेतन पडते, बबन राऊळ, सदानंद अणावकर, राजा सामंत, अनिल खुडपकर, अमोल राणे, राजू गवंडे, यशवंत तेंडोलकर, बाबा मयेकर, राजेश म्हाडेश्वर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सचिन पवार म्हणाले की, लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने कुडाळ येथे आयोजित मान्सून महोत्सव हा कौतुकास्पद असून, हा ग्रुप दशावतार कला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ईशा गोडकरने बहारदार नृत्य सादर केले. त्यानंतर ‘अश्विनी उद्धार’ हे संयुक्त दशावतार नाटक सादर झाले.
दुसऱ्या दिवशीही गर्दीचा उच्चांक
पहिल्या दिवशी मान्सून महोत्सवाला रेकॉर्ड ब्रेक रसिक प्रेक्षकांची गर्दी होती. अशीच उच्चांकी गर्दी दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या ‘अश्विनी उद्धार’ दशावतार नाटक पहायला प्रेक्षकांनी केली होती. बसायला जागाच नसल्याने काही प्रेक्षकांनी उभे राहून, तर काहीनी थेट रंगमंचावरच बैठक ठोकत या नाटकाचा आस्वाद घेतला. या नाटकाने या चौथ्या महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लाजरी ग्रुपचे सदस्य व प्रेक्षक उपस्थित होते.