ढिसाळ नियोजनाचा स्पर्धकांना फटका
By admin | Published: November 22, 2015 11:24 PM2015-11-22T23:24:29+5:302015-11-23T00:03:32+5:30
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पत्रिकेवरील निमंत्रितांनाच स्पर्धेची माहिती नाही
सावंतवाडी : प्रथमच सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनला सिंधुदुर्गमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला होता. मात्र, नियोजनाच्या लगीनघाईत कबड्डी स्पर्धेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्यस्तरातून आलेल्या मुला-मुलींना राहण्यासाठी सोय न केल्याने शनिवारी बस स्थानकावर राहावे लागले. काहींनी तर खाजगी फ्लॅटचा आसरा घेतला.
उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेवर पाहुण्यांची नावे घातली खरी, पण त्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. यावर आमदार नीतेश राणे यांनी आक्षेप घेत निमंत्रण न देता नावाचा गैरवापर केल्याचा मुद्दा पुढे करीत यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. खासदार विनायक राऊत यांनाही कार्यक्रमाची तारीख आयोजकांनी कळवली नसल्याने त्यांनी रविवारी सकाळी रत्नागिरीहून मुंबई गाठली आणि आयोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग राज्य कबड्डी फेडरेशनला राज्यस्तरीय ४२ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. ही स्पर्धा सावंतवाडीतील जिमखाना मैदानानजीक असलेल्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. एवढी मोठी स्पर्धा जिल्ह्यात होत असताना या स्पर्धेची कुठेच प्रसिध्दी नाही. तसेच कार्यक्रमाबाबत कुणाला माहितीही देण्यात आलेली नाही.
जिल्हा कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष दीपक केसरकर राज्याचे ग्रामविकास मंत्री असून त्यांनी एक-दोन बैठका घेत नियोजनाची सर्व जबाबदारी स्थानिक पातळीवर दिली होती. या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च शासकीय पातळीवर उचलण्यात येणार असून, काही खर्च खाजगी पातळीवर करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची पत्रिकाही एका कागदावर काढण्यात आली असून पत्रिकेवर नाव असलेल्या निमंत्रितांना पोहोचली नसल्याचे पुढे येत आहे.
तर दुसरीकडे कबड्डी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी राज्यभरातून शेकडो मुले-मुली सावंतवाडीत दाखल झाले. यातील काही स्पर्धक शनिवारीच आले. मात्र, या मुलांना रात्री उशिरापर्यंत राहण्याची जागाच मिळाली नाही. काही मुलांनी एसटी बसस्थानक तसेच खाजगी प्लॅटमध्ये राहण्याचे पसंत केले. तर मुलींना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आयोजकांची धावपळ सुरू होती. यातील काही मुलींना भटवाडी तसेच सबनीसवाडा आदी ठिकाणी ठेवण्यात आले होते. तर आमदार नीतेश राणे यांनी आम्हाला स्पर्धा कुठे आहे, हेच माहीत नाही. मग पत्रिकेवर नाव कसे घातले, असा सवाल उपस्थित केला. तसेच न विचारता नाव पत्रिकेवर घातल्याने संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असून प्रशासनालाही याबाबतचा जाब विचारू, असे त्यांनी सांगितले.
एकंदरीतच कबड्डी स्पर्धेच्या गडबडगोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू असून आता आयोजक उद्घाटनाची चूक समारोपातून तरी भरून काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे. (प्रतिनिधी )
अन्य पाहुण्यांचीही हीच अवस्था
कार्यक्रम पत्रिकेवर नाव घालण्यात आलेल्यांमध्ये आमदार तसेच माजी आमदार, स्थानिक पदाधिकारी यांची नावे आहेत. पण यातील आमदार किरण पावसकर यांच्यासह आमदार विजय सावंत, माजी आमदार राजन तेली यांनी तर कुठे आहे कार्यक्रम? असा प्रश्न केला. अॅड. निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक यांनी आपणास जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला होता. तसेच ई-मेल वर कार्यक्रम पत्रिका आल्याचे स्पष्ट केले.
विनायक राऊत : योग्य माहितीच दिली नाही
कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत असून उद्घाटक म्हणून नाव घातलेल्या खासदार विनायक राऊत यांना कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम केव्हा आहे, हेच माहिती नव्हता. त्यांना आयोजकांनी रितसर माहिती दिली नसल्याने कबड्डीचे उद्घाटन २१ नोव्हेंबरला असल्याची माहिती मिळाल्याने ते शनिवारी जिल्ह्यात आले होते. मात्र, २२ नोव्हेंबरला उद्घाटन असल्याचे कळताच त्यांनी सकाळी रत्नागिरीचा दौरा करून रात्रीच मुंबईला जाण्याचे पसंत केले. त्यांनीही या स्पर्धेकडे पाठ फिरवली असून, आयोजनावर नाराजी व्यक्त केली. कबड्डी स्पर्धेची निश्चित अशी तारीख आयोजकांकडून सांगण्यात आली नाही. मला येण्याची इच्छा असून स्पर्धेच्या उद्घाटनाला मुकावे लागल्याचे स्पष्ट केले.