बंडखोर उमेदवार आधीच भूमिगत?

By admin | Published: February 12, 2017 10:35 PM2017-02-12T22:35:03+5:302017-02-12T22:35:03+5:30

बंडाचा झेंडा फडकणार की उतरणार? : आज ठरणार निवडणूक रिंगणातून माघारीच्या आलेखाची उंची

Rebel candidate already underground? | बंडखोर उमेदवार आधीच भूमिगत?

बंडखोर उमेदवार आधीच भूमिगत?

Next



प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळी शिवसेनेमध्ये ‘न भुतो न भविष्यती’ अशी बंडखोरी झाली आहे. १३ फेब्रुवारीला बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, म्हणून पक्ष नेत्यांकडून विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. आपल्यावरील दबाव व अर्ज माघार टाळण्यासाठी काही बंडखोर भूमिगत झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बंडाचा झेंडा फडकणार की खाली उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यावरच माघारीच्या आलेखाची उंची ठरणार आहे.
जिल्ह्यात शिवसेनेत उमेदवारीसाठी असंख्य कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र, त्या सर्वांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य नव्हते. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक विद्यमान सदस्यांनाही यावेळी उमेदवारी मिळालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून काम करूनही त्याची पक्षाने दखल घेतली नाही, असेही अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेतील इच्छुकांनीच मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेतील इच्छुकांचे बंड हे केवळ अपक्ष उमेदवारी भरण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर या बंडखोरांना भाजपने आपल्या गोटात घेऊन उमेदवारीही बहाल केली आहे. त्यामुळे भाजपला आयते उमेदवार मिळालेच त्याचबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात बंडखोर उमेदवारांसह सेना कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याने पक्षाचे बळही आपोआपच वाढले आहे. या बंडखोरीचे रुपांतर पक्षांतरामध्ये झाले आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्याचे वाटत होते तरीही दुसऱ्या पक्षात जायचे नव्हते किंवा ज्यांना भाजपमधून वा अन्य पक्षातून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी थेट बंडखोरी करीत सेनेच्याच उमेदवारांविरोधात निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील बंडखोरी ही नवीन-जुना या वादातून झाली आहे. सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश लाड यांनी नाचणे जिल्हा परिषद गटातून अपक्ष तर नाचणे गणातून भाजपतर्फे अर्ज दाखल केला आहे. हरचेरी गटामध्ये सेनेच्या विनया गावडे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड करीत कॉँग्रेसमधून उमेदवारी दाखल केली आहे. गोळप गटातही सेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. कर्ला गणात सेनेचे नदीम सोलकर यांनी बंड केले. त्यांनी ५ फेब्रुवारीला सेनेचा राजीनामा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्याकडे सोपवला आहे. सोलकर यांनी स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत आता सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर व संगमेश्वरमध्येही सेनेत बंडखोरी झाली असून, तेथील काही बंडखोर ‘नॉट रिचेबल’ आहेत. संगमेश्वरमधील सेनेचे राजेश मुकादम यांनी बंडखोरी केली असून, ते सेनेच्या उमेदवार रचना महाडिक यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुकादम हे माघार घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण रत्नागिरीपेक्षाही उत्तर रत्नागिरीत यावेळी शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी व गीते-कदम गटात जोरदार चकमकी झडत असून, बंडखोरी केलेल्या अनेक इच्छुकांनी भाजपमधून अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल झाले आहेत. बंडखोरांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीला बंडखोर निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची शक्यता धूसर झाली आहे. दुसरीकडे चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी बंड करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ तर ९ पंचायत समितींच्या ११० अशा एकूण १६५ जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.

Web Title: Rebel candidate already underground?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.