चौपदरीकरण भूसंपादनासाठी ३४२ कोटी प्राप्त
By admin | Published: May 2, 2017 11:51 PM2017-05-02T23:51:20+5:302017-05-02T23:51:20+5:30
चौपदरीकरण भूसंपादनासाठी ३४२ कोटी प्राप्त
सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निश्चित केलेल्या जागेच्या मोबदल्यासाठी कणकवली तालुक्यातील महामार्गानजीक असणाऱ्या २२ गावांसाठी १९६ कोटी, तर कुडाळ तालुक्यातील १८ गावांसाठी १४६.३२ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मंजूर केले असून, ही सर्व ३४२ कोटी ३२ लाख रुपये निवाडा रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम लवकरच संबंधित खातेदारांना वितरित केली जाणार असून, त्यानंतरच प्रशासन जागेचा ताबा आपल्याजवळ घेणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले, पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, कोस्टलचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. नलावडे, आदी उपस्थित होते.
सावळकर म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेची (संपत्ती) निवाडा रक्कम मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला जिल्ह्यातील महामार्गानजीक असणाऱ्या४० गावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव दोन टप्प्यात पाठविण्यात आला होता. त्यापैकी कणकवली तालुक्यातील २२ गावांसाठी १९६ कोटी रुपये निवाडा रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून मंजूर होऊन कणकवली प्रांत कार्यालयास ही रक्कम जमा झाली आहे. तर कुडाळ तालुक्यातील १८ गावांसाठी १४६ कोटी ३२ लाख रुपये निवाडा रक्कम कुडाळ प्रांत कार्यालयास प्राप्त झाली आहे. ही निवाडा रक्कम लवकरच खातेदारांना वाटप केली जाणार आहे. रक्कम वितरित करताना टीडीएस (कर) कापून घेतला जाणार नसल्याचेही सावळकर यांनी स्पष्ट करत खातेदारांना मोबदला वितरित केल्यानंतर त्या जागेचा ताबा प्रशासन घेणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यास हुसकावून लावा
जिल्हाधिकारी भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या क्रीडा संकुल मैदानावर नैसर्गिक विधी होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे व याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना प्रभारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना पत्रकार परिषदेत बोलावून घेत सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. मात्र असा कोणताही प्रकार क्रीडा संकुलमध्ये झालेला नसल्याचे बोरवडेकर यांनी स्पष्ट केले. मात्र प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी ‘त्या’ व्हिडिओची कल्पना देताच आपण हा व्हिडिओ पाहिला नसल्याचे बोरवडेकर यांनी सांगितले. या विधानावर सावळकर आक्रमक झाले. तत्काळ प्राधिकरण क्षेत्राची पाहणी करा व ज्याठिकाणी खासगी झोपड्या उभारल्या आहेत व जेथे शौचालयाची व्यवस्था नाही अशांना हुसकावून लावा व कारवाई करा, असे आदेश क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. हागणदारीमुक्त जिल्ह्यात उघड्यावर शौचास जाणे भूषणावह नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली.