नुकसानभरपाई हमीपत्रावर मिळावी
By admin | Published: October 9, 2015 11:36 PM2015-10-09T23:36:14+5:302015-10-09T23:38:39+5:30
कणकवली पंचायत समिती सभेत ठराव : नगरपंचायत निकालाचे सभेवर सावट
कणकवली : कोट्यवधींची आंबा, काजू नुकसानभरपाई तांत्रिक मुद्यात अडकून पडली आहे. ही नुकसानभरपाई हमीपत्रावर दिली जावी, या सूचनेवरून कणकवली पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेण्यात आला. बहुसंख्येने कॉँग्रेसचे सदस्य असलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेवर कणकवली नगरपंचायत निकालाचे सावट दिसले.
सभा कोणत्याही विषयावर विशेष चर्चा न होता गुंडाळण्यात आली. कणकवली पंचायत समितीची मासिक सभा उपसभापती भिवा वर्देकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एम. ए. गवंडी उपस्थित होते. तोंडवली सरवणकरवाडी येथील नळयोजनेसंदर्भात तक्रारी असल्याने गटविकास अधिकारी, सदस्य, अभियंता शिंदे यांनी योजनेला भेट दिली. शिंदे यांनी आधी तपासणी केल्याचे सांगितले. या योजनेला बनावट पाईप वापरण्यात आल्याचा आरोप करत सदस्यांनी शिंदे यांना तपासणी केली की पाहणी? असे विचारले असता फक्त पाहणी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या योजनेबाबत दिशाभूल होत असून ज्या अभियंत्याने काम केले त्याचे मूल्यांकन करा. संबंधित शाखा अभियंत्याचीह ही जबाबदारी असून कागदांचा खेळ चालला असल्याचा आरोप गुरव यांनी केला. अध्यक्षांनी पुढील सभेत अहवाल देण्याचे आदेश दिले.
कणकवली नगरपंचायतीकडून राष्ट्रीय लोकसंख्या प्रगणक म्हणून १३ शिक्षकांना थेट पत्रे पाठविण्यात आली. शिक्षण विभाग याबाबत अंधारात असून प्रगणकांची निवड करताना निकष डावलण्यात आले असल्याचे महेश गुरव यांनी सांगितले. यापुढे शिक्षण विभागाला विश्वासात घेऊनच अशी नेमणूक करावी, अशी सूचना गुरव यांनी केली.
तालुक्यात एमआरईजीएसची साडेतीन कोटींची कामे झाल्यास ६०-४० चे गुणोत्तर होऊ शकते. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींनी हे गुणोत्तर साध्य केल्याचे अध्यक्ष वर्देकर यांनी सांगितले. इंदिरा आवास योजनेसाठी यावेळी फक्त ५ उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी या योजनेचे उद्दिष्ट १२१ होते. सन २०१३-१४ ची ६६ कामे पूर्ण झाली असून मागील वर्षीची कामे अद्याप सुरू व्हायची आहेत. तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला १२ आणि एकूण ८५० कच्च्या बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शाळांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश उपसभापती वर्देकर यांनी दिले. नरडवे, हरकुळ, कणकवली, कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची झडपे वेळीच लावून घेतली जावी, अशी पत्रे संबंधित ग्रामपंचायतींना द्यावीत, असे आदेशही वर्देकर यांनी दिले. (प्रतिनिधी)
राणे यांना डॉक्टरेट : अभिनंदनाचे ठराव
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अरविंद राणे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तालुका हागंदारीमुक्त झाल्याबद्दल सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, अरूण चव्हाण यांचे अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. पंचायत समिती इमारत मंजूर झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व सभापती आस्था सर्पे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
टंचाई आराखडा तातडीने बनवा
भाग्यलक्ष्मी साटम यांनी यावर्षी पाऊस कमी झाल्याने पुढील वर्षी पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यासाठी तालुक्याचा टंचाई आराखडा लवकरात लवकर करावा, अशी सूचना केली. मागील वर्षीच्या अपुऱ्या विंधन विहिरींची कामे प्राधान्यक्रमाने घेण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या. मात्र, सदस्यांमधूनच आता नव्याने ‘अ’, ‘ब’ पत्रके करावी लागणार अशी कुजबुज झाली.