‘सी वर्ल्ड’बाबत प्रस्ताव प्राप्त
By admin | Published: October 4, 2016 12:49 AM2016-10-04T00:49:09+5:302016-10-04T00:54:02+5:30
उदय चौधरी : भूसंपादनाची जबाबदारी पर्यटन महामंडळाची
सिंधुदुर्गनगरी : ‘सी-वर्ल्ड’ संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्राप्त झाला आहे. मात्र, भूसंपादनाचे काम आपले नाही. आपण केवळ दर निश्चिती करून महामंडळाला देणार आहोत. याला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल. जागा खरेदी पर्यटन महामंडळाकडून केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.
पर्यटन महामंडळाला सूचना
नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन केले जाणार असून, यात अतिरिक्त २५ टक्के मोबदला वाढीव स्वरुपात दिला जाणार आहे. या प्रकल्पाला ग्र्रामसभा घेऊन आंदोलने करून, प्रत्यक्ष भेटून ग्रामस्थ विरोध करत आहेत. त्यांना आपण कोणतेच ठोस आश्वासन देऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रकल्पाचा आराखडा तयार केलेली संस्था, सामाजिक प्रशासन अधिकारी आणि ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते जमीनदार यांची एकत्रित बैठक घेऊन स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्याच्या सूचना आपण एम.टी.डी.सी. ला दिल्या आहेत. लवकरच या संदर्भात बैठक होईल, असेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले.
महामार्ग दुरुस्तीचे काम महिन्याभरात
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गणेश चतुर्थीपूर्वी या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामही काही ठिकाणी ब्लॉक वापरून करण्यात आले होते. मात्र त्याचा प्रभावी उपयोग झाला नाही. आता पाऊस संपल्यातच जमा आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर महामार्गाचे रिकार्पेटींग करावे, अशा सक्त सूचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले.