दहा कोटींचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2016 12:10 AM2016-01-09T00:10:03+5:302016-01-09T00:47:26+5:30
१४ वा वित्त आयोग : पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण २१ कोटी जमा
सिंधुदुर्गनगरी : १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर असलेल्या निधीतील दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाकडून १0 कोटी ४ लाख रूपयांचा निधी जिल्हा वित्त विभागाला प्राप्त झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण २१ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असून पहिल्या टप्प्यातील १0 कोटी ९६ लाख रूपयांचा निधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी बोलताना दिली.
या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाला मंजुरी दिल्याने १३ व्या वित्त आयोगाचा निधी जवळ-जवळ १00 टक्के खर्ची होणार आहे. यापूर्वी वित्त आयोगाच्या निधी वित्त विभागाला प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी वितरीत केला जात असे. मात्र, १४ वा वित्त आयोग लागू झाला आणि निधी वाटपाचे निकषच बदलले.
प्राप्त होणारा कोट्यवधींचा निधी वित्त विभागामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना वर्ग न करता तो निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग करताना त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर व क्षेत्रफळावर निधी वर्ग केला जात आहे.
डिसेंबर २0१५ मध्ये शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १0 कोटी ९६ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. हा सर्व निधी ग्रामपंचायतीचा ९0 टक्के लोकसंख्येवर १0 टक्के क्षेत्रफळाच्या आधारावर वर्ग करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील १0 कोटी ४ लाखाचा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या वाटपासंदर्भात शासन स्तरावर मार्गदर्शक सूचना
नसल्याने तूर्तास हा निधी सर्व ग्रामपंचायतींना वर्ग होणे बाकी आहे. शासनाकडून मार्गदर्शन आल्यास तत्काळ हा निधी वर्ग केला जाणार असल्याचे वित्त अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
१३ वा वित्त आयोग : निधी १00 टक्के खर्च
जिल्हा परिषदेला गतवर्षी प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या कोट्यवधीच्या निधीला दोन वेळा शासनाकडून मुदत वाढ देण्यात आली होती.
आता याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. यातील एकही पैसा शासनास परत जाणार नसून १00 टक्के निधी खर्च होणार असल्याचे वित्त अधिकाऱ्यांनी सांगितले.