जबाबदारीचे भान ठेवाव

By Admin | Published: February 13, 2015 01:13 AM2015-02-13T01:13:15+5:302015-02-13T01:14:08+5:30

प्रमोद सावंत : सावंतवाडी पंचायत समिती सभेत अधिकाऱ्यांना सूचना े

Recognize responsibility | जबाबदारीचे भान ठेवाव

जबाबदारीचे भान ठेवाव

googlenewsNext

सावंतवाडी : जबाबदार अधिकारी असल्याचे भान ठेवा. राजकारण्यांसारखी उत्तरे देऊ नका, अशा शब्दात सभापती प्रमोद सावंत यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. शिवाय कृषी पंप, कनेक्शनसंदर्भात चालढकलपणा करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पंचायत समिती सेस फंडातून उपलब्ध निधीची तरतूद करण्यासाठी येत्या १५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करा, असे आवाहन सावंत यांनी केले.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपसभापती महेश सारंग, गटविकास अधिकारी शरद महाजन, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, माजी सभापती प्रियांका गावडे, सुनयना कासकर, पार्वती हिराप, विनायक दळवी, नारायण राणे, लाडोबा केरकर आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीपासूनच पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी अधिकारी वर्गाला टार्गेट करीत धारेवर धरले. खारलॅण्ड, झाराप-पत्रादेवी महामार्ग, वीज वितरण आदी खात्यांना प्रश्न उपस्थित केले.
महामार्गावरील बांदा पूलानजीक पडलेला खड्डा तसेच झाराप पत्रादेवी महामार्गावरील गतिरोधकानजीक सूचना फलक नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत संपूर्ण हायवेचा सर्व्हे करून किरकोळ कामे आठ दिवसात सुधारा, असेही यावेळी सुनावण्यात आले.
यावर प्रमोद सावंत यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांसह संपूर्ण हायवेचा सर्व्हे करण्याची जबाबदारी घेण्याची सूचना केली. सर्व कामे आठ दिवसात पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोसारखा प्रकार करू, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. ग्रामपंचायत सरपंच तसेच पंचायत समिती सदस्य यांना ओळखपत्र देण्यात येणार असून, शासन स्तरावरून १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच महिला व बालकल्याण खात्यांतर्गत आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत कुपोषित बालकाच्या पाल्यांना प्रतीदिनी मिळणारी १०० रुपये बुडीत मजुरी योजना रद्द करण्यात आल्याचे सावंतवाडी पंचायत समितीच्या सभेत सांगण्यात आले. यावेळी हेच का ‘अच्छे दिन’ अशी प्रतिक्रियाही उपस्थित पंचायत समितीच्या सदस्यांमधून उमटत होती. तसेच अंगणवाडी मुलांचे आधारकार्ड बनविण्याचा कार्यक्रम शासन स्तरावरून बनविण्यात आला असून, ३१ मार्चपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात
आले. (वार्ताहर)

रमेशकुमार, ‘आप’चा अभिनंदनाचा ठराव
यावेळी जिल्ह्यात कुडाळ येथे हत्ती पकड मोहीम यशस्वीरित्या पार पाडत दोन हत्ती जेरबंद केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्य नारायण राणे यांनी मांडला. तर दिल्लीत आपले सरकार आल्याने आम आदमी पार्टीच्या अभिनंदनाचा ठराव सदस्या रोहिणी गावडे यांनी मांडला.

Web Title: Recognize responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.