स्वाभिमानच्या केणींनी स्वत:ची पात्रता ओळखावी, हरी खोबरेकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:01 PM2019-02-06T17:01:49+5:302019-02-06T17:25:22+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.
मालवण : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मच्छीमारांचे प्रश्नच माहिती नाही. त्यामुळे मच्छीमार तसेच मच्छीमार संस्थानी आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे बालिश तालुकाध्यक्ष असल्याचे वाळू व्यावसायिकांनी म्हटले असल्याने केणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.
मालवण येथील शिवसेना तालुका कार्यालयात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदार केणी यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, संमेश परब, यशवंत गावकर, अक्षय रेवंडकर, श्रेयस रेवंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वाळू प्रश्न हा सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. याबाबत वाळू व्यावसायिकांनीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करत वाळू व्यवसायिकांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाळू लिलाव प्रक्रिया रखडली असल्याचे जाहीर केले आहे. वाळू प्रक्रिया रखडल्याने मंदार केणी यांची रोजीरोटी बंद झाल्याने दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकासकामाना प्राधान्य देतो, असे खोबरेकर म्हणाले.
शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अथार्ने विकासाची गंगा आली आहे. वीज, रस्ता तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी भरघोस निधी शासनाकडून मिळत आहे. विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करून जनतेची दिशाभूल करत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून आगामी काळ हा शिवसेनेचाच असेल. त्यामुळे केणी यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची चिंता करावी, असा टोला खोबरेकर यांनी लगावला.
केणींना प्रभागाचाही अभ्यास नाही
चांदा ते बांदा योजना फसवी असल्याचे स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी हे सांगत आहे. मात्र केणी यांच्याच धुरीवाडा प्रभागातील मच्छीमारांना आऊटबोट इंजिन चांदा ते बांदा योजनेतून देण्यात आले. केणी यांच्या प्रभागात अनेक विकासकामे शिवसनेनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहे.
स्वत:च्या प्रभागाचा अभ्यास नसलेल्या केणी यांनी तालुकाध्यक्ष म्हणून आपले तालुक्यासाठी काय योगदान आहे? हे तपासून पाहावे, असे आव्हान बाबी जोगी यांनी दिले. पतंग महोत्सव हा पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला. शहरातील किनारपट्टीचा प्रसार व पर्यटन वाढीच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पतंग महोत्सव घेतला गेला, असे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.