सॅनिटरी नॅपकिन वाटपची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डला नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:02 PM2020-02-07T16:02:17+5:302020-02-07T16:21:52+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून महिलावर्गात मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्याकरिता उत्कर्ष प्लस हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून महिलावर्गात मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्याकरिता उत्कर्ष प्लस हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २४ जानेवारी २०१९ रोजी जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती, ८ पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी केवळ ३ तासांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात ६६ हजार ७०७ महिलांना ४ लाख २४२ सॅनिटरी नॅपकिन स्वच्छतेचे वाण म्हणून वाटप करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने महा हळदीकुंकू कार्यक्रमात वाटप केलेल्या सॅनिटरी नॅपकिनची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने सुरू असलेल्या उत्कर्षा प्लस कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन वाटप करून मासिक पाळीचे प्रबोधन करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
८४ टक्के किशोरवयीन मुली याचा वापर करत असून शिक्षण घेत नसलेल्या १६ टक्के मुली वापर करीत नाहीत. मात्र, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक लाख महिलांचा करण्यात आलेल्या सर्व्हेत जिल्ह्यातील ५२ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
यात २५ वर्षांवरील महिलांचा समावेश होता. त्यामुळे सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन महिलांना हे ह्यस्वच्छतेचे वाणह्ण वाटप करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी असताना घेतला होता. यासाठी गावातील महिलांना मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले होते. तसेच वितरित करण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन हे वाण उच्च दर्जाचे असणार आहे.
पाच पॅडचे एक पॅक एका महिलेला देण्याचे निश्चित करून त्यासाठी लागणारा निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला होता. त्यानुसार २४ जानेवारी २०१९ रोजी जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती, ८ पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयात एकाचवेळी महा हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून या तीन तासांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६६ हजार ७०७ महिलांना ४ लाख २४२ सॅनिटरी नॅपकिनचे स्वच्छतेचे वाण म्हणून वाटप करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची माहिती लिम्का बुक रेकॉर्ड यांना ४ एप्रिल रोजी देण्यात आली होती. तीन तासांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात ६६ हजार ७०७ महिलांना ४ लाख २४२ सॅनिटरी नॅपकिन स्वच्छतेचे वाण म्हणून वाटप केलेल्या जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असल्याची माहिती के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी किशोरवयीन मुलींसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत उत्कर्षा योजना सुरू केली होती. त्यानंतर यात सर्व महिलांचा समावेश करून उत्कर्षा प्लस योजना सुरू करून सॅनिअरी नॅपकिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या उपक्रम यशस्वी करण्यात आला.
यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या सर्व विभागांनी प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे समिधा नाईक यांनी यावेळी सांगितले.