Sindhudurg: आंबोली थंडीने गारठली, पारा आठ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 25, 2024 03:51 PM2024-01-25T15:51:02+5:302024-01-25T15:54:23+5:30
आंबोली ( सिंधुदुर्ग ) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या ...
आंबोली (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वांत निचांकी तापमानाची नोंद गुरुवारी आंबोलीत झाली असून पारा तब्बल आठ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नेहमीच गुलाबी थंडीची प्रतीक्षा असणाऱ्यांनी आंबोलीत वास्तव्यास यावे, असे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू अनुभवायचे असल्यास दक्षिण कोकणातील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण म्हणून आंबोली हिल स्टेशनकडे पाहिले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत या तिन्ही हंगामाचा आस्वाद घेत असतात.
आंबोलीत साधारपणे सप्टेंबर महिन्यापासूनच थंडीचा हंगाम सुरू होतो. यावर्षी मात्र पूर्ण थंडीचा हंगाम विना थंडी गेला होता. हिवाळी हंगामाच्या सरते शेवटी आंबोलीमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आंबोलीमध्ये पारा आठ अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेले पर्यटक सुखावले आहेत.
आंबा बागायतदार सुखावला
ही थंडी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पडत असून कडाक्याच्या थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. कारण जर थंडी नसेल तर आंब्यांला मोहर येत नाही. या चिंतेने ग्रासलेल्या आंबा बागायतदारांनासुद्धा आता दिलासा मिळाला आहे.
आंबोलीत स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन
पक्षी वैभवसुद्धा थंडीच्या प्रतीक्षेत असते, कारण पक्ष्यांना थंडी आवडते. त्यामुळे स्थलांतर पक्षी व स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आंबोलीत पडत असलेल्या थंडीने संपूर्ण निसर्ग सृष्टी आनंदित झाली आहे. पर्यटकही या थंडीचा आस्वाद घेत आहेत.