पर्यावरणाच्या नावाखाली चुकीचा दंड वसूल
By admin | Published: April 30, 2015 09:12 PM2015-04-30T21:12:20+5:302015-05-01T00:22:49+5:30
घारपुरे : न्यायालयात जाण्याचा इशारा
सावंतवाडी : चारचाकी खरेदी-विक्रीवेळी पर्यावरण कराच्या नावाखाली दुप्पट दंड वसूल करणाऱ्या जिल्हा आरटीओ कार्यालयाविरोधात सावंतवाडीतील मधुकर घारपुरे यांनी दंड थोपटले आहेत. दंडाच्या नावावर चुकीच्या पद्धतीने रक्कम घेतली जात आहे. त्यामुळे ती पुन्हा द्यावी, अन्यथा आपण न्यायालयात दाद मागू, असा इशारा घारपुरे यांनी दिला आहे.
माझ्या नावावर असलेली गाडी दुसऱ्या व्यक्तीला विकली. मात्र, ती विकत असताना रजिस्ट्रेशन नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे पर्यावरण कर भरला गेला नाही, असे घारपुरे यांनी सांगत तीन वर्षांचा पर्यावरण कर भरून घेतला.
हा कर भरण्यास उशीर झाल्याने त्या दंडाची रक्कम म्हणून तीन हजार रुपये भरून घेतले. आरटीओ अधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे मला मानसिक त्रास झाला आहे, असेही घारपुरे म्हणाले. याबाबत आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांची तक्रार असेल, तर आरटीओ कार्यालयात असणाऱ्या अपिलीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी तशी दाद मागावी. मात्र, नियमानुसार पर्यावरण कराची मुदत संपल्यानंतर संबंधित वाहनधारकाने ती रक्कम स्वत: येऊन कार्यालयात भरावयाची आहे. ती भरली गेली नसल्यास ज्यावेळी खरेदी-विक्रीच व्यवहार होतो, त्यावेळी ती भरून घ्यावी, असे आदेश आहेत. (वार्ताहर)