नुकसानाचे पुनर्पंचनामे
By admin | Published: January 6, 2016 11:57 PM2016-01-06T23:57:56+5:302016-01-07T00:54:51+5:30
आंबा, काजू नुकसान : अद्याप शेतकरी भरपाईपासून वंचित
चिपळूण : फेब्रुवारी व मार्च २०१५मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश वाटप करताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन, ज्या खातेदारांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्पंचनामे करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
ज्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अथवा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते प्रत्यक्ष वहिवाट करत असल्याची खात्री होण्यासाठी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत या काळात वस्तुस्थितीदर्शक पंचनामे सुरु आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच व वहिवाटदार यांच्या उपस्थितीत हे पंचनामे करुन यादी तयार केली जाणार आहे. दि. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या यादीचे वाचन होईल. दि. १६ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंतच्या यादीवरुन प्रत्येक गावच्या मंडल अधिकारी कार्यालयात हरकती घेतल्या जातील. दि. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मंडल अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने प्राप्त हरकतींवर सुनावणी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. दि. ९ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी तयार केली जाणार असून, ही यादी तहसीलदार कार्यालयात जमा केली जाईल. याबाबतचे पत्र सर्व ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक यांना तहसीलदार कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आंबा, काजूचे नुकसान झाल्याने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, ही भरपाई देताना शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती नसणे, आधार कार्ड नसणे, बँक खात्याचे नंबर चुकीचे देणे, एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असणे यामुळे शेतकरी नुकसानापासून वंचित असल्याचे दिसून आले. नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेकजण नुकसानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नव्याने पुनर्पंचनामे करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
पारदर्शक पंचनामे : वाटपात अडचणी
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे नुकसान वाटपात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानाचे पुनर्पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पारदर्शकपणे हे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.