थेट मुलाखतीतून भरती
By admin | Published: May 15, 2016 12:13 AM2016-05-15T00:13:13+5:302016-05-15T00:13:13+5:30
आरोग्यमंत्र्यांची माहिती : दीपक सावंत यांची देवगड रूग्णालयाला भेट
देवगड : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त १४ जिल्हयाप्रमाणेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे थेट मुलाखतीद्वारे कायमस्वरूपी नियुक्त केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये आले असता दिली.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे खासगी दौऱ्यावर देवगड येथे आले असून अचानक त्यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितिन बिलोलीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके, डॉ. नलावडे आदी उपस्थित होते.
तसेच देवगड उप जिल्हा रूग्णालयासाठी २२ कोटी ६३ लाख रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आर्थिक तरतूद उपलब्ध होताच या उपजिल्हा रूग्णालयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जागेचीही पाहणी आरोग्यमंत्री सावंत यांनी केली. देवगड ग्रामीण रूग्णालयाला दुरूस्ती व नूतनीकरणासाठी १६ लाख रूपये वर्षभरात निधी उपलब्ध केला आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून राज्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून जनतेची सेवा केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाऊन एकही पद रिक्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेंगुर्ले येथील नवीन उपजिल्हा रूग्णालयासाठी ६ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान, त्यांनी देवगड रूग्णालयातील विविध समस्या आणि सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. आरोग्यमंत्र्यांच्या हा खासगी दौरा असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती. (प्रतिनिधी)
अचानक दौरा सेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती
४सिंंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हेही जिल्हे अतिदुर्गम भागात असल्याने या तिन्ही जिल्ह्यातील डॉक्टरांची पदे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांप्रमाणे थेट मुलाखतीद्वारे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही अस्थायी स्वरूपाची भरली जात होती. तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या अचानक आलेल्या देवगड दौऱ्यात तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तसेच चुकीच्या इंजेक्शनमुळे संदीप कावले यांना आपले प्राण गमवावे लागले होते. याची अद्याप दखलही आरोग्यमंत्र्यांनी घेतली नसल्याचे बोलले जात आहे.