शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन
By अनंत खं.जाधव | Published: September 5, 2023 05:04 PM2023-09-05T17:04:01+5:302023-09-05T17:17:52+5:30
सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी ...
सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी शिक्षक दिनीच ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.
यावेळी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी बसस्थानका जवळच रोखून धरला. त्यामुळे पोलिसांच्या विरोधात आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. केसरकर आंदोलन दडपू शकत नाहीत, अशी टीका यावेळी उपस्थित युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
युवा सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे केसरकर यांच्या निवासस्थानासमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. नेमके आंदोलक कुठून येणार याबाबत सांशकता होती. त्यामुळे पोलीस कुमक आंदोलकांवर विशेष लक्ष ठेवून होती. अशा परिस्थितीत १२ वाजण्याच्या सुमारास येथील गवळी तिठा परिसरातून आंदोलन चालत मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर येण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना बस स्थानकासमोरून पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिक्षण मंत्री म्हणून केसरकर यांनी एकतर शिक्षक भरती, करावी अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली. केसरकरशिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांनी फक्त प्रवक्तेगिरी करावी असे युवा सेनेचे मंदार शिरसाट म्हणाले. गेली अनेक महिने मागणी असून सुद्धा बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता त्यांना येणाऱ्या काळात नक्कीच जनता धडा शिकवेल असा इशारा दिला.
यावेळी काजल सावंत, मीनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव, वैष्णवी पितळे, पंकज शिरसाट, योगेश नाईक, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, मदन राणे, वीरेंद्र चव्हाण, अमित भोगले, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, आबा सावंत, मायकल डिसोजा, बाळा गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.