लिलावामुळे जुन्या गाड्यांतील पार्टस्चा पुनर्वापर
By admin | Published: February 19, 2015 11:07 PM2015-02-19T23:07:09+5:302015-02-19T23:38:03+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळ : एका गाडीचे मिळतात सुमारे दोन लाख रुपये
मेहरून नाकाडे - रत्नागिरी -‘एस. टी.’चे आयुर्मान दहा वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कोणतीही गाडी भंगारात काढण्यापूर्वी तिचे करण्यात आलेले रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. भंगारात विकलेली गाडीसुध्दा जशीच्या तशी कधीच वापरात आणली जात नाही. गाडीतील चांगल्या पार्ट्सचा पुनर्वापर केला जातो. साधारणत: एका गाडीचे दोन लाख रूपये मिळतात.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एस. टी.च्या गाड्या निर्लेखित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. महामंडळाच्या एकूण ३१ विभागांमध्ये निर्लेखन प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालयाकडून निश्चित केला जातो. वर्षातून एकदा लिलाव प्रक्रिया होते. मध्यवर्ती कार्यालयाकडून निर्लेखित करण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या मागवण्यात येते. लिलावाची तारीख निश्चित झाल्यानंतर संबंधित गाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. त्यानंतर गाडीतील चांगले पार्ट्स बाजूला काढले जातात.
लिलाव प्रक्रिया ई-प्रणालीव्दारे होत असली तरीही प्रक्रिया राबवण्यासाठी महामंडळाकडून एका संस्थेला नियुक्त केले जाते. त्या संस्थेकडून लिलाव जाहीर झाल्यानंतर ठेकेदार आपापला माणूस पाठवून लिलावातील गाड्या पाहून आकडे नमूद करतात. प्रत्येक विभागाकडून लिलावातून किती रूपये मिळतील, यांचा अंदाज केलेला असतो, त्यानुसार अधिक पैसे देणाऱ्याला गाड्या विकल्या जातात. लिलाव प्रक्रिया विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते.
गाड्या भंगारात काढल्या जातात, त्यावेळी एस. टी.च्या ताफ्यातील कमी झालेल्या गाड्यांची संख्या भरून काढण्यासाठी नवीन गाड्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पुरविल्या जातात. महामंडळ दरवर्षी नवीन गाड्यांची मागणी नोंदवते, त्यानंतर त्या गाड्यांची बांधणी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये केली जाते. गाड्या बांधणीनंतर त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतात.
एखादी गाडी भंगारात काढण्यात आली असेल, परंतु गाडी वापरण्यास योग्य असेल तर संबंधित गाडीचा वापर करण्यात येतो. गाडीचे आयुर्मान शिल्लक असताना मोठा अपघात घडला व त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले असेल तर मात्र ती गाडी भंगारात काढली जाते. अन्यथा गाडीचे नूतनीकरण करून गाडी वापरात आणली जाते. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी ठरलेली एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद असलेल्या एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांची सुरक्षितता जपली जाते. ५६ ते ६० प्रवासी घेऊन प्रवास करीत असताना अपघात होऊ नये, याची काळजी घेतली जाते. प्रवाशांना गाडीत घेण्यापूर्वीच चालक तपासणी करूनच गाडी ताब्यात घेतो. म्हणूनच एस. टी.ला विशिष्ट आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे.