शौचालय नसलेल्या घरांवर येणार ‘रेडस्टिकर’!
By admin | Published: December 3, 2015 11:19 PM2015-12-03T23:19:53+5:302015-12-03T23:51:30+5:30
प्रत्येक घरावर स्वच्छता विभागाकडून स्टिकर : शौचालय नसलेली घरे येणार ओळखून
सिंधुुदुर्गनगरी : शौचालय बांधकामास गती मिळावी त्याचबरोबर ‘घर तेथे शौचालय’ बांधले जावे, त्याचा शंभर टक्के वापर केला जावा यासाठी स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शौचालय नसणाऱ्या घरांना ‘रेडस्टिकर’ (खतरा, धोका) लावण्यात येणार आहे. त्यामुळे शौचालय नसलेली घरे सहज ओळखता येणार आहे.शौचालय बांधकाम करु न त्याचा नियमित वापर केला जावा यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावागावातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबांना अनुदान दिले जात आहे. असे असले तरी निर्मल जिल्हा व हागणदरीमुक्त जिल्हा हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास होणारा विलंब लक्षात घेता. आता राज्य शासनाने ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबियांच्या घरावर लाल स्टिकर लावण्यात येणार आहे.पूर्वी निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न झाला. या माध्यमातून अनेक गावामध्ये शौचालयाचे प्रमाण १०० टक्केच्या आसपास नेण्यास जिल्हापरिषद यशस्वी झाली.
आता शासनाने स्वच्छ भारत अभियान हाती घेवून या माध्यमातून शौचालय बांधकाम केल्यावर वैयक्तिक स्वरूपाची मदत म्हणून १२ हजार रूपये व आर्थिक ठोस अशी मदत दिली जाते. या मदतीमुळे जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधकामात प्रगती दिसते. असे असले तरी आजही दुर्गम व दळणवळणाची सुविधा नसलेल्या गावात शौचालय बांधकामात म्हणावी तशी गती दिसून येत नाही. शासनाने या अभियानाला गती मिळावी म्हणून विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ज्या कुटुंबियांंनी शौचालयाचे बांधलेली नाहीत अशा घरावर लाल स्टिकर चिटकवले जाणार आहे. तसेच ज्या घरात शौचालय बांधले आहे पण त्या शौचालयाचा वापर ५० टक्के ही होत नाही, अशा कुटुंबांच्या घरावर ‘फिप्टी-फिप्टी असा मजकूर असलेले मोसंबी रंगाचे स्टिकर लावले जाणार आहे. तसेच ज्या कुटुंबियांच्याकडे शौचालय आहे परंतु ते जीर्ण झाले आहे अशा कुटुंबियांच्या घरावर जरा जपून असा मजकूर असलेले स्टिकर चिटकवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जेथे शौचालय आहे व त्याचा १०० टक्के वापर केला जात आहे. अशांच्या घरावर ‘लय भारी’ असा मजकूर असलेले स्टिकर लावले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे शौचालय नसलेली घरे सहजरित्या ओळखता येणार आहेत.संपूर्ण स्वच्छता अभियानाअंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी ५९२९ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट होते. यापैकी आजपर्यंत ३८८७ शौचालय बांधून पूर्ण झाले असून २०४३ शौचालये बांधकामासाठीच्या हालचाली सुरू आहेत. मुळात सिंधुदुर्ग हा जिल्हा १०० टक्के हागणदरीमुक्तच्या उंबरठ्यावर आहे. या जिल्ह्यात प्रत्येक घरामागे एक शौचालय नसले तरी लोक शौचालयाचा वापर करतात. (प्रतिनिधी)
‘रेड’ स्टिकर
ज्या घरी शौचालय नाही, शौचालयाचे कसलेही बांधकाम केलेले नाही. अशा घरांवर हे स्टिकर लावण्यात येतील.
‘लय भारी’ स्टिकर
जिथे शौचालय आहेत. १०० टक्के शौचालयाचा वापर करणाऱ्या घरावर ‘लय भारी’ चे स्टिकर लावले जाणार आहे.
‘फिप्टी फिप्टी’ स्टिकर
जिथे शौचालय आहे, परंतु शौचालयाचा वापर ५० टक्के होतो. तिथे ‘फिप्टी-फिप्टी’ पिवळ्या रंगाचे स्टिकर लावले जाणार आहे.
भगवे स्टिकर
जिथे शौचालय जीर्ण अवस्थेत आहे. त्या ठिकाणी जरा जपून असा मजकूर असलेले भगव्या कलरचे स्टिकर लावले जातील.