वृक्षतोडीमुळे कोकणची अधोगती
By Admin | Published: February 20, 2015 09:39 PM2015-02-20T21:39:22+5:302015-02-20T23:14:39+5:30
महेंद्र नाटेकर : वृक्षमित्र संघाच्या सभेत मार्गदर्शन
कणकवली : भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कोकणात हिरवीगार वनश्री होती. घनदाट जंगल होते. खळाळणारे ओढे होते. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. खऱ्या अर्थाने कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वन अधिकारी, लाकूड व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे वृक्षांची कत्तल होत आहे. यामुळे कोकणच्या विकासाची अधोगती होत आहे, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. ते कणकवली येथे बुधवारी आयोजित केलेल्या वृक्षमित्र संघाच्या आमसभेत बोलत होते.आमसभेला यावेळी शांताराम नारकर, लाडोबा तावडे, बाबूराव आचरेकर, नंदकुमार आरोलकर, सदाशिव हडकर, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणामध्ये प्रचंड वृक्षतोड झाली ती लोकांच्या स्थानिक गरजांसाठी झाली नसून, परजिल्ह्यांतील लाकूड व्यापाऱ्यांनी स्वत:च्या, अधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी केली. रक्षकच भक्षक झाल्याने कोकणची अधोगती झाली, असे सांगून प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, ही भयाण परिस्थिती असह्य होऊन काही वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीच्या विरुद्ध दंड थोपटले. वृक्षतोड थांबून वृक्षारोपण व संवर्धन व्हावे, यासाठी वृक्षमित्र संघाची निर्मिती केली. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक आप्पासाहेब पाटील व वनीकरणाचे भांगले यांच्या सहकार्याने शेकडो शालेय रोपवाटिका, किसान रोपवाटिका निर्माण केल्या. वनौषधी संस्थेचीही स्थापना केली. खेडोपाडी जाऊन जनजागृती केली, असेही प्रा. नाटेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
आजही जनजागृतीची गरज असल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तसेच खुल्या गटासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजिन वृक्षमित्र संघातर्फे करण्यात आले आहे. २0 मार्चपर्यंत या स्पर्धेत इच्छुकांनी आपले साहित्य प्रा. महेंद्र नाटेकर, कलमठ, ता. कणकवली या ठिकाणी पाठवावे, असे आवाहन वृक्षमित्र संघाने केले आहे.