रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:04 PM2020-02-19T16:04:35+5:302020-02-19T16:06:23+5:30
रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. रोजगार उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने होणाऱ्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. रोजगार उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने होणाऱ्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
राजापूर तालुक्यातील नाणार गावात रिफायनरी प्रकल्प उभारणार असल्याचे तत्कालीन फडणवीस सरकारने जाहीर केले होते. या प्रकल्पाला सत्तेत असूनही शिवसेनेने विरोध केला होता. या विरोधामुळे अखेर तो प्रकल्प रद्द करण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली होती. दरम्यान, नाणारवासीयांचा विरोध असल्याने शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही, तर या उद्योगाला जे जमीन मालक जागा देतील तेथे हा प्रकल्प उभारला जाईल अशी भूमिका शिवसेनेने अलीकडच्या काळात जाहीर केली होती.
रिफायनरीच्या समर्थनार्थ २० जुलै २०१९ रोजी रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला होता. तर सद्यस्थितीत रिफायनरीसाठी सशर्त जमीन देण्यासाठीची लेखी संमतीपत्रे गोळा झाली आहेत. ७६.३६ एकर जमीन मिळण्याची शक्यता आहे. कोणताही दर जाहीर न होता एवढ्या मोठ्या प्रमाणात संमती मिळणे ही कोकणमधील एक अद्भुत क्रांतीच असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर या संघटनेच्या झेंड्याखाली बसलेल्या सर्व आंदोलकांच्या गळ्यात शिवसेनेचे नाव व धनुष्य बाणाचे चिन्ह असलेले भगवे शेले होते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविरोधात आता शिवसैनिकच रिफायनरीच्या समर्थनार्थ रणांगणात उतरल्याचे चित्र आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्या नेतृवाखालील या लक्षवेधी आंदोलनात अनेक शिवसैनिक सामील झाले होते.