नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब; नवे बदल एक जानेवारीपासून स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 05:32 AM2023-12-30T05:32:48+5:302023-12-30T05:33:32+5:30

या बदलांमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराकडून प्रेरणा घेण्यात आली आहे.

reflection of chhatrapati armor on a naval uniform new changes will be accepted from january 1 | नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब; नवे बदल एक जानेवारीपासून स्वीकारणार

नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब; नवे बदल एक जानेवारीपासून स्वीकारणार

संदीप बोडवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण (जि.सिंधुदुर्ग) :भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या एपोलेट्स अर्थात गणवेशावरील मानचिन्हामध्ये अखेर बदल करण्यात आला आहे. गुलामीची मानसिकता मागे सोडत भारताच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतिबिंब या एपोलेट्समध्ये उमटल्याचे पाहावयास मिळत आहे. या बदलांमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराकडून प्रेरणा घेण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे नौदल दिनाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मोठी घोषणा केली होती. दरम्यान, नौदल अधिकारी नव्या एपोलेट्स १ जानेवारी २०२४ पासून स्वीकारणार आहेत. ॲडमिरल, व्हाइस ॲडमिरल, सर्जन व्हाइस ॲडमिरल, रिअर ॲडमिरल, सर्जन रिअर ॲडमिरल या ॲडमिरल श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या एपोलेट्समध्ये अनेक बदल पाहावयास मिळत आहेत. मानचिन्हांच्या मागची  प्रेरणा आणि प्रतिकांचा अर्थदेखील नौदलाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. 

गोल्डन नेव्ही बटण हे गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर पडण्याची आमची इच्छाशक्ती दर्शवते. त्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार प्रतिबिंबित आहे. या राजमुद्रेच्या आठ बाजू नौदलाची आठही दिशांवर नजर आहे, असे सूचित करते. अष्टकोनाच्या खाली तलवार आहे. त्यातून युद्ध लढण्याची आपली क्षमता अधोरेखित होते आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा त्याचा अर्थ आहे. त्याखाली टेलिस्कोप आहे. यातून नौदलाची दूरदृष्टी दिसते. जगात होत असलेल्या बदलांकडे दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची क्षमता यातून अधोरेखित करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

नौदलातील रँक भारतीय परंपरेनुसार असायला हव्यात. लवकरच नौदल अधिकाऱ्यांच्या पदांना भारतीय परंपरेनुसार नावे देण्यात येतील, असे मोदी नौदलदिनी म्हणाले होते. ब्रिटिश काळातील रँक्स बदलण्यात येतील. त्याजागी भारतीय नावे दिली जातील. आम्ही छत्रपती शिवरायांपासून प्रेरित आहोत. आम्ही गुलामी सहन करणार नाही.  गुलामीच्या प्रथा जिवंत ठेवणारी प्रतीके आपल्याला संपुष्टात आणावी लागतील, असे मोदींनी म्हटले होते.

 

Web Title: reflection of chhatrapati armor on a naval uniform new changes will be accepted from january 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.