नियमबाह्य आराखड्याला विरोध करणार

By admin | Published: June 21, 2017 12:26 AM2017-06-21T00:26:38+5:302017-06-21T00:26:38+5:30

कन्हैया पारकर यांची माहिती : कणकवलीतील पार्किंग आरक्षणाचा विषय

Regarding the rule of outline | नियमबाह्य आराखड्याला विरोध करणार

नियमबाह्य आराखड्याला विरोध करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : कणकवली शहरातील पार्किंग आरक्षणाचा आराखडा बोगस असून या नियमबाह्य आराखड्याला मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास जनहितासाठी त्याला तीव्र विरोध करणार असल्याचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी कन्हैया पारकर म्हणाले, शहरातील पार्किंग आरक्षणाचा विकास करणाऱ्या विकासकाशी आपला काहीही वैयक्तिक वाद नाही. मात्र, चुकीच्या पध्दतीने कोणी जर जनतेची दिशाभूल करून शहरातील आरक्षण विकास करीत असेल तर त्याला लोकप्रतिनिधी म्हणून आपला विरोध राहणार आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शासनाच्या १० मे २०१६ च्या अधिसूचनेप्रमाणे पार्किंग आरक्षण विकासाला परवानगी देणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांनी या अधिसूचनेतील अन्य बाबींचाही विचार केला आहे का? याचे जनतेला उत्तर द्यावे.
अधिसूचनेप्रमाणे जनरल कंडिशनमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी आरक्षण हे तळमजल्याला अग्रक्रमाने प्रस्तावित करायचे आहे. तशाप्रकारची लेखी मागणी विकासकाकडे त्यांनी केली आहे का? मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंग आराखडा नियमानुसार कशाप्रकारे असावा याबाबत विकासकाला माहिती देणे आवश्यक होते. तसे झाले आहे का?
जनरल कंडिशनमध्ये नमूद असल्याप्रमाणे पार्किंग तळमजला, स्टिल्ट, पहिला मजला तसेच सेपरेट एंट्री व एक्झिट द्यावी याबाबतची मागणी विकासकाकडे का केली नाही? नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे पार्किंग जागा न घेता तळमजला व दुसरा तळमजला येथे पार्किंगसाठी का मान्यता देण्यात येत आहे. डबल बेसमेंटसाठी डी.सी.आर.मध्ये स्पष्टपणे नियम नमूद केलेले आहेत. त्याचे उल्लंघन होत असताना मुख्याधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष का करीत आहेत? कोकण विभागाच्या उपसंचालकांनी मल्टिस्टोरेज बेसमेंटसाठी नियमात शिथिलता द्यावी असे आदेश त्यांना दिले आहेत का? परवानगीसाठी त्यांच्यासमोर आलेल्या आराखड्यामध्ये दोन मजल्यांमध्ये ३८००.६५ चौरस मीटर एवढे क्षेत्र बांधकामात मिळविणे कसे शक्य
आहे. याबाबतही त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा असे पारकर यावेळी म्हणाले.
कन्हैया पारकर पुढे म्हणाले, नगरसेवक बंडू हर्णे आरक्षण पार्किंग आणि भाजी मार्केट जागेच्या विकासकाची तळी उचलत आहेत. कारण त्यांची जागा या आरक्षणामध्ये समाविष्ट असल्याने त्याचा लाभ त्यांना होणार आहे. शहरातील डी. पी. रोडजवळ ते स्वत: विकसित करीत असलेल्या जागेसाठीही त्यांनी नगरसेवकपदाचा दुरूपयोग केला आहे. याबाबत मला माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर तेथील आराखडा त्यांना बदलावा लागला. त्यामुळेच त्यांना सर्वत्र पारकर दिसू लागले आहेत. मात्र, मी ही बाब उघड केली नसती तर तेथील गाळे खरेदी करणाऱ्यांची फसवणूक झाली असती. याबाबतची शहानिशा कोणाला करायची असेल तर त्यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे करावी, असेही पारकर यावेळी म्हणाले.

‘त्यांचे’ आव्हान स्वीकारतो
शहरातील पार्किंग आरक्षणाचा विकासकाने दिलेला आराखडा चुकीचा आहे. हे दाखवून देण्याचे बंडू हर्णे यांचे आव्हान मी स्वीकारत आहे. नियमबाह्य तसेच चुकीच्या पध्दतीने पार्किंग आरक्षणाचा विकास कुठल्याही परिस्थितीत आपण करु देणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढली जाईल. चुकीचे कृत्य नजरेसमोर होत असताना त्याला न थांबविले तर नगरपंचायतीच्या इतिहासात ते एक नवे रेकॉर्ड तयार होईल. हे काँग्रेस नगरसेवकांनी लक्षात घ्यावे, असेही पारकर यावेळी म्हणाले.


 

Web Title: Regarding the rule of outline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.