नोंदणी सिंधुदुर्गची अन् जाहिरात रत्नागिरीत
By admin | Published: November 26, 2015 09:31 PM2015-11-26T21:31:56+5:302015-11-27T00:12:32+5:30
शासनाचा अजब कारभार : सुरक्षारक्षक उमेदवारांची नोंदणी आॅनलाईन करण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी
मालवण : शासनाच्यावतीने सुरक्षारक्षक मंडळ रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सुरक्षारक्षक उमेदवारांची नोंदणी प्रक्रियेची जाहिरात रत्नागिरी जिल्ह्यातील एका दैनिकात प्रकाशित केली आहे. त्यावर भारतीय मजदूर संघाने आक्षेप घेतला असून, ही जाहिरात सिंधुदुर्गातील दैनिकात देऊन ही नोंदणी आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग सुरक्षारक्षक मंडळ अध्यक्षांकडे भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस हरी चव्हाण यांनी केली आहे.सुरक्षारक्षक मंडळ रत्नागिरी -सिंधुदुर्गाची स्थापना जुलै २०१४ मध्ये करण्यात आली. यापूर्वी कोल्हापूर सुरक्षारक्षक मंडळामार्फत विविध शासनाच्या आस्थापनांमध्ये सुरक्षा पदावर नेमणुका देण्यासाठी कोल्हापूर मंडळामार्फत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील उमेदवारांची नोंदणी केली जात होती. या सुरक्षारक्षक पदाच्या पात्र उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जात आर्थिक पिळवणुकीला बळी पडल्याचे नियुक्त सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.नोंदणी प्रक्रियेबाबत आक्षेपसुरक्षारक्षक मंडळ रत्नागिरी-सिंधुदुर्गची स्थापना झाल्यानंतर शासनामार्फत या मंडळाच्यावतीने सुरक्षारक्षक पदाची नोंदणी करण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे. परंतु, मंडळामार्फत नोंदणी करण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, या वृत्तपत्राची सिंधुदुर्ग आवृत्ती नसल्यामुळे सिंधुदुर्गातील उमेदवारांना नोंदणी प्रक्रियेची साधी कल्पनाही मिळालेली नाही. अशा जाहिरातीमुळे नोंदणी प्रक्रियेबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनेक शंका-कुशंकाना वाव दिला आहे.
आर्थिक देवघेवीच्या व्यवहाराला संधी
आज सिंधुदुर्गात अनेक दैनिके आहेत. मात्र, या दैनिकांमध्ये ही जाहिरात न देता रत्नागिरी जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात दिली आहे. अशा जाहिरातींमुळे मंडळाचे अधिकारी सुरक्षारक्षक नोंदणीबाबत कोणता हेतू साध्य करणार आहेत, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षारक्षक हे पद महत्त्वाचे आणि संवेदनशील असून त्यासाठी सक्षम स्थानिक पात्र उमेदवारांची नियुक्ती मिळणे गरजेचे आहे. मंडळाच्या अशा कारभारामुळे आर्थिक देवघेवीच्या व्यवहाराला संधी मिळून सक्षम उमेदवार डावलले जाण्याची भीती आहे. यामुळे सुरक्षारक्षक पदाची नोंदणी प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
कामगारमंत्र्यांची भेट घेणार
याप्रश्नी भारतीय मजदूर संघातर्फे भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यामार्फत कामगार मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षारक्षक मंडळाच्यावतीने करण्यात आलेली गोंधळी कारभाराची माहिती देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांची फसवणूक न होता त्यांना हक्काची नियुक्ती मिळवून देण्यासाठी मजदूर संघ कार्यरत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.