सावंतवाडी नगरपरिषदेने केलेले पुनर्वसन वादात, व्यावसायिकांमध्ये वादाची ठिणगी
By अनंत खं.जाधव | Published: October 3, 2023 06:06 PM2023-10-03T18:06:11+5:302023-10-03T18:06:38+5:30
सावंतवाडी : एकाच कुटुंबातील सदस्यांनी एका पेक्षा अधिक जागा अडविल्याने सावंतवाडी नगर पालिकेने व्यावसायिकांना दिलेल्या नव्या जागा या वादात ...
सावंतवाडी : एकाच कुटुंबातील सदस्यांनी एका पेक्षा अधिक जागा अडविल्याने सावंतवाडी नगर पालिकेने व्यावसायिकांना दिलेल्या नव्या जागा या वादात सापडल्या असून विक्रेत्यामध्येच वाद निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहेत.
यावरुन आज, मंगळवारी सकाळी विक्रेत्यांच्या काही गटात वाद झाले. यावेळी पोलिसांना ही पाचारण करण्यात आले. परंतु आमच्या पेक्षा तुम्ही पालिका प्रशासनाशी संपर्क साधून जागेचा तिढा सोडवा, अशा सुचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
येथील नगर पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईत असलेले फुल, फळ विक्रेते अन्य इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या परिसरात असलेल्या पर्यायी जागेत गेले आहेत. परंतु काही व्यावसायिकांच्या कुटुंबियांनी एका पेक्षा अनेक जागा अडविल्या आहेत. काही विक्रेत्यांना जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे नाराजी पसरली आहे. यावरुन वाद उभे राहिले आहेत. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना बोलविण्यात आले. मात्र जागा ठरवून देण्याबाबत किंवा कोणाला किती जागा द्यावी याचा निर्णय नगर पालिकेचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्यांशी चर्चा करुन यावर तोडगा काढण्यात यावा, अशा सुचना पोलिसांनी व्यावसायिकांना दिल्या.
काही व्यावसायिकांना व्यवस्थित जागा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर आहे. वर छप्पर नसल्यामुळे काही जण नाराज आहेत तर काही जण बसतात त्या ठिकाणी विद्युत जनित्र असल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता पालिका प्रशासनाने याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे. दरम्यान हा वाद नगर पालिकेत पोहचला असून सर्व व्यावसायिकांकडून माहिती घेतली जाईल असे नगर पालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.