आमटेंकडून रुग्णांना पुनर्जिवनासह पुनर्वसन
By admin | Published: December 4, 2014 10:27 PM2014-12-04T22:27:18+5:302014-12-04T23:39:42+5:30
नरेंद्र नायडू : सावंतवाडीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात ‘समाजसेवा’ विषयावर व्याख्यान
सावंतवाडी : ‘भीतीवर प्रीतीची जीत व्हावी’ या आगळ्यावेगळ्या प्रेरणेतून बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली व कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन प्रकल्पाला ‘कुष्ठनिवास’ वा ‘करुणालय’ नाव न देता ‘आनंदवन’ हे काव्यमय नाव दिले आहे. बाबा आमटेंनी व त्यांच्या परिवाराने फक्त कुष्ठरुग्णांचे रोगोपचार न करता त्यांचे पुनर्वसनासोबत त्यांना विविध मार्गांनी स्वावलंबी बनवून त्यांना पुनर्जिवन प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन नरेंद्र नायडू यांनी केले.
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ या प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नरेंद्र नायडू, महाविद्यालयाचे प्राचार्य विकास कठाणे, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, डॉ. दीपक तुपकर, ज्येष्ठ अध्यापक डॉ. सुहास नायडू, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.
अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, आदी पीडितांना निरपेक्ष मदतीचा हात दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा त्यांची मुले डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे हे ‘आनंदवन’ ‘हेमलकसा’ व ‘सोमनाथ’, आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पुढे चालवत आहेत, असे नरेंद्र नायडू यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
नूतन गावडे, प्रास्ताविक डॉ. राजेंद्र पाटील यांंनी केले. डॉ. विकास कठाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल काटकर, भार्गवी लक्काकुला, योगेश ताजणे, अक्षय मोरे, श्रीराज केसकर, नुरसबा अन्सारी, गजाला मुजावर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आयुर्वेद महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा करीत असतानाच समाजसेवेचे व्रत अंगीकारावे. - नरेंद्र नायडू