काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी दिलासादायक
By admin | Published: May 8, 2015 12:02 AM2015-05-08T00:02:31+5:302015-05-08T00:07:29+5:30
जिल्हा बँकेवर आघाडीचे वर्चस्व : मतदारांकडून पुन्हा एकदा नारायण राणेंच्या नेतृत्वावर विश्वास
रजनीकांत कदम-कुडाळ -लोकसभा व विधानसभेमध्ये पराभव पत्करल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने एकत्र आघाडी करत जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी १५ जागांवर घवघवीत यश संपादन केले. येथील मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे चित्र या निकालावरून दिसते. तसेच जिल्हा बँकेतील विजय हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणारा आणि भविष्यातील निवडणुकीसाठी उत्तेजन देणारा ठरणार आहे.
सिंधुुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ पदांकरिता ५ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संकल्प सिध्दी पॅनेलचे १८, भाजप शिवसेना व इतर सहकार क्षेत्रातील व्यक्ती मिळून तयार केलेल्या सहकार वैभव पॅनेलचे १८ व अपक्ष ५ असे मिळून ४१ उमदेवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीचा निकाल ७ मे रोजी ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जाहीर करण्यात आला. या निकालानंतर संकल्पसिध्दी गटाचे १५ व सहकार वैभव पॅनेलचे ४ असे मिळून १९ उमेदवार निवडून आले. अपक्षांना मात्र इथे खातेही खोलता आले नाही. यापूर्वीच्या जिल्हा बँक निवडणुकींचा विचार केला असता, या निवडणुकींमध्ये फारसे राजकीय वातावरण नसायचे. यावर्षी मात्र या निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला. ही निवडणूक काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या राजकीच पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली. त्यामुळे निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
अनेक नेत्यांनीही घातला लक्ष
सहकार क्षेत्रातील निवडणुकीमधील जिल्हा बँकेची सत्ता आपल्याकडे रहावी, याकरिता प्रत्येक पक्षाचे जिल्ह्यातील नेते मंडळींनी विशेष लक्ष घातले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह खासदार विनायक राऊत, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्यातील आमदार तसेच अन्य नेत्यांनीही याकडे विशेष लक्ष घातले होते.
या निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादीने एकत्र येत निर्माण केलेल्या संकल्पसिध्दी पॅनेलच्या उमेदवारांपैकी काँगे्रस पक्षाचे ९, तर राष्ट्रवादी पक्षाचे ६ उमेदवार निवडून आले. तसेच भाजप, शिवसेना व समविचारी उमेदवारांनी बनविलेल्या सहकार वैभव पॅनेलमधील भाजपाचा १, शिवसेना २ व अपक्ष असलेले विलास गावडे आदी चार उमेदवार निवडून आले. कुडाळ तालुक्यासाठी असलेल्या मतदार संघाकरिता काँग्रेसकडून प्रकाश मोर्ये यांना २०, तर काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या सुभाष मडव यांनी बऱ्यापैकी दहा मते घेतली. तर पुष्पसेन सावंत यांनीही ९ मते घेतली. त्यामुळे मडव यांना पडलेली मते ही काँग्रेसचीच पडली का, असा प्रश्न काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निकाल हाती आल्यानंतर पडला होता. सावंतवाडीमध्ये आघाडीकडून दत्ताराम वारंग हे उभे होते. त्यांच्या विरोधात बंडखोरी करीत काँग्रेसचेच आल्मेडा लॉरेन्स उतरले. यामुळे काँगे्रसच्या मतांची विभागणी झाली. याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परब यांना झाला. ते १९ मतांनी विजयी झाले. वेंगुर्ल्यातही काँगे्रसचे उमेदवार मनीष दळवी यांच्या विरोधात बंडखोरी करीत निवडणुकीत उरतरलेले दत्ताराम नाईक यांच्यामध्ये काँगे्रसची झालेली मतविभागणीचा फायदा शिवसेनेच्या राजन गावडेंना झाला. ते १३ मते पडून निवडून आले.
नव्याने बनलेले संचालक
या निवडणुकीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संचालकपदी बसण्याचा बहुमान मिळाला आहे. यामध्ये प्रमोद धुरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विलास गावडे, राजन गावडे, प्रकाश परब व इतर काहीजण आहेत.
अनेकांसाठी महत्त्वाची निवडणूक
ही निवडणूक राजन तेली, पुष्पसेन सावंत, सतीश सावंत, व्हिक्टर डान्टस, अतुल काळसेकर अशा विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी व नेत्यांसाठी महत्त्वाची होती. दरम्यान, निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
बंडखोरांची डाळ शिजली नाही
काँग्रेसमध्ये पाचजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. त्यामुळे काँग्रेसवर बंडखोरीचा परिणाम होऊन काँग्रेसच्या उमेदवारांना भोगावा लागणार, असे चित्र दिसत होते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा निकाल हाती येताच निकालानुसार कोणत्याही बंडखोराची डाळ शिजली नाही. फक्त काही प्रमाणात काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान कमी झाले.
अनेक संचालक पराभूत
या निवडणुकीत विद्यमान संचालक असलेल्या राजन तेली, डी. बी. वारंग, कृष्णनाथ तांडेल, गजानन गावडे व सुगंधा साटम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर सतीश सावंत, व्हिक्टर डान्टस, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मोर्ये, विकास सावंत, आर. टी. मर्गज, नीता राणे या विद्यमान संचालकांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.